छत्रपती संभाजीनगरच्या तीन तालुक्यांत ६० हजार मतदारांची नावे दुबार? तक्रारींमुळे प्रशासन बेजार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 15:22 IST2025-11-04T15:20:55+5:302025-11-04T15:22:36+5:30
तक्रारींच्या अनुषंगाने तालुकानिहाय पडताळणीचे काम सुरू असल्याचा दावा जिल्हा निवडणूक विभागाने केला.

छत्रपती संभाजीनगरच्या तीन तालुक्यांत ६० हजार मतदारांची नावे दुबार? तक्रारींमुळे प्रशासन बेजार
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील मतदारयाद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दुबार नावे असल्याच्या तक्रारी येण्यास सुरुवात झाली आहे. प्रशासनाकडे आतापर्यंत गंगापूर, पैठण आणि फुलंब्री या तीन विधानसभा मतदारसंघातील सुमारे ६० हजार नावांबाबत तक्रारी आल्या असून दुबार नावांच्या तक्रारींमुळे प्रशासन बेजार झाले आहे.
तक्रारींच्या अनुषंगाने तालुकानिहाय पडताळणीचे काम सुरू असल्याचा दावा जिल्हा निवडणूक विभागाने केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ असल्याने मनपा, जि. प., पं. स., न. प. व नगर पंचायतींची प्रभाग रचना अंतिम झाली आहे. जि. प. व न.प.ची आरक्षण सोडत प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, या निवडणुकांसाठी अंतिम होणाऱ्या मतदारयाद्यांवर राजकीय पक्षांनी आक्षेप घेत याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदारांची दुबार नावे असल्याचे लेखी तक्रारींसह आरोप सुरू झाल्याने प्रशासनाच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
कोणत्या मतदारसंघातून तक्रारी?
पैठण विधानसभा मतदारसंघात २५ हजार दुबार नावे असल्याची पहिली तक्रार आहे. दुसरी तक्रार गंगापूर विधानसभा मतदारसंघातील नावांबाबत असून तिथे तब्बल ३६ हजार नावे दोन वेळा असल्याचे म्हटले आहे. फुलंब्री विधानसभा मतदारसंघातही २२०० दुबार नावे असल्याची तक्रार आहे. या तक्रारी मतदान नोंदणी अधिकाऱ्यांकडे पाठविल्या असून त्यांना पडताळणी करण्याचे आदेश दिले. घरोघरी जाऊन बीएलओ पडताळणी करतील.
प्रशासकीय यंत्रणा दडपणात
दुबार मतदार यादीत नावे आढळली तर बडवून काढा, असा इशारा विरोधकांनी दिल्यानंतर बीएलओ म्हणून काम करण्यास कुणीही पुढे येणार नाही, अशी भीती प्रशासकीय यंत्रणेतून व्यक्त होत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांच्या दबावतंत्रात प्रशासकीय यंत्रणा येण्याची दाट शक्यता आहे.
जि.प.ची मतदार यादी ‘लॉक’
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १ जुलैपर्यंत यादी लॉक केली आहे. त्या तारखेपर्यंत असलेली मतदारांची यादी निवडणुकीत वापरता येणार आहे. त्यामुळे मतदार स्थलांतरित होण्याचे किंवा करण्याचे समीकरण जुळवून कुणालाही जि.प.चे मैदान मारता येणे शक्य नाही, असा प्रशासकीय दावा आहे. तसेच शहरातील काही इच्छुकांना जि.प. निवडणूक लढायची असेल तर त्यांचेही नाव ग्रामीण भागात स्थलांतरित करता येणार नाही.
६९ हजार ५९० नावे वगळली
अनेक मतदारांकडे दोन मतदान ओळखपत्रे असल्याचा तक्रारकर्त्यांचा आरोप आहे. यामुळे मतदारावर गुन्हा दाखल होऊन तुरुंगवास, दंडासह मतदानाचाही अधिकार काढून घेतला जाऊ शकतो. जिल्ह्यात वर्षभरात ६९ हजार ५९० मृत, दुबार मतदारांची नावे वगळल्याचा प्रशासकीय दावा आहे. गावाकडे एक मतदान, शहरात दुसरे कार्ड असणारे अनेक मतदार आहेत. असे मतदार किती आहेत, याची माहिती आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिल्याची चर्चा आहे. मात्र जिल्हा प्रशासनाला अद्याप आयोगाकडून काहीही पत्र आले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.