नामांकित ज्वारी कुक्कुटपालनाच्या दारी
By Admin | Updated: May 11, 2014 23:59 IST2014-05-11T23:56:03+5:302014-05-11T23:59:33+5:30
मल्हारीकांत देशमुख , परभणी गारपीटग्रस्त मराठवाड्यातील नामांकित गहू, ज्वारी काळी पडल्यामुळे ती विकत घेण्यास व्यापारी नाक मुरडत आहेत.

नामांकित ज्वारी कुक्कुटपालनाच्या दारी
मल्हारीकांत देशमुख , परभणी गारपीटग्रस्त मराठवाड्यातील नामांकित गहू, ज्वारी काळी पडल्यामुळे ती विकत घेण्यास व्यापारी नाक मुरडत आहेत. ग्रामीण भागात ८०० ते ९०० रुपये क्विंटल ज्वारी १ हजार ते १२०० रुपये क्विंटलने गव्हाची विक्री होत आहे. ज्वारीपेक्षा कडब्याला भाव असून पूर्णत: सरकाळे (पान नसलेला कडबा) शेकडा बाराशे रुपये दराने विक्री होत आहे. काळी ज्वारी कुक्कुटपालन केंद्रावर पाठविली जात आहे. पेरणीचे दिवस तोंडावर आले असतानाही गारपिटीने गारठलेल्या कृषी जीवनाला जाग आलेली दिसत नाही. भर उन्हाळ्यात शेतं शेवाळल्यासारखी हिरवी दिसत असून अंतर्गत मशागतीचे कामे अजूनही ठप्प आहेत. खरीप पाठोपाठ रबी हंगामाची वाताहत झाल्यामुळे कधी नाही तो शेतकरी हातपाय गाळून बसला आहे. यावर्षीच्या पावसाळ्याने तब्बल चैत्र महिन्यापर्यंत पाठलाग केल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. खात्या धान्याची नासाडी झाली. अंब्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शासनाकडून आर्थिक मदत देताना अनेक गावेच्या गावं वगळण्यात आली. निवडणुकीच्या धामधुमीत लोकप्रतिनिधी बेभान असून प्रशासकीय यंत्रणा आचारसंहितेचे तुणतुणे वाजवत आहे. गाºहाणे कोणाजवळ मांडावेत, अशी शेतकर्यांची अवस्था झाली आहे. मे महिना अर्ध्यावर आला असतानाही पावसाची खुमखुमी गेलेली नाही. अवेळी पडणारा पाऊस ऐन पेरणीच्यावेळी दगा देणार, अशी भिती व्यक्त होत आहे. बियाणे विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली असली तरी खरेदी तर सोडाच साधी चौकशी करायला देखील शेतकरी दुकानाची पायरी चढत नसल्याचे चित्र दिसत आहे. मे महिना अर्ध्यावर आला असून नेहमीप्रमाणे पीक कर्जासाठी बँकामध्ये गर्दी दिसत नाही. एकंदर गेल्या वर्षीच्या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी पुरता मोडला असून खेडोपाडी कुठेही उत्साहाचे वातावरण दिसत नाही. परप्रांतीय धान्याला मागणी गहू व ज्वारी खाण्यास योग्य नसल्यामुळे त्याला बाजारपेठेत मागणी नाही. हे धान्य वर्षभर टिकविणेदेखील कठीण आहे. कारण आताच गहू, ज्वारीचे पीठ होत असून त्याला भोंग (कीड) लागत आहे. परिणामी हे धान्य विकण्याखेरीज शेतकर्यांना पर्याय राहिलेला नाही. बेभाव दराने धान्याची विक्री करण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे. परिणामी वर्षभराची तरतूद म्हणून परप्रांतीय धान्य विकत घ्यावे लागत आहे. सध्या बाजारपेठेत एमपी लोकवन २ हजार ते २ हजार २०० , शिऊर तीन हजार रुपये, शरबती २८०० रुपये, गुजराती २२०० रुपये क्विंटलप्रमाणे गहू विकत घ्यावा लागत आहे. पावश्याची केविलवाणी हाक... भर उन्हाळ्यात पावसाळी वातावरण निर्माण झाल्यामुळे पावश्याची ‘पेरते व्हा’ अशी हाक रानारानातून गुंजते आहे. त्याच्या हाकेला प्रतिसाद देणारा शेतकरी मात्र शेताकडे फिरकत नसल्यामुळे त्याची अवस्था केविलवाणी झाल्यासारखी वाटत आहे. मृग नक्षत्रात दिसणारे बदल एक महिना आधीच दृष्टीक्षेपात येत असून दारी-अंगणी अवेळी पागोळ्या भिरभिरत आहेत. निसर्ग चक्रातील हा अनोखा बदल कृषी जीवनाला अचंबित व भयभीत करणारा आहे. पुन्हा ‘मिलो’ची याद... १९७२ च्या दुष्काळी परिस्थितीत विशेष करुन मराठवाड्यात अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे गावोगाव रेशन दुकानावरुन मिलो नावाची ज्वारी विक्रीला आली होती. या ज्वारीच्या तांबड्या भाकरी होत असे. यावर्षी गारपिटीमुळे ज्वारी काळी पडली आहे. ही कान्ही ज्वारी धुतली तरी त्याची भाकरी लालसर काळी होत असून जुन्या लोकांना पुन्हा मिलो ज्वारीची आठवण होत आहे. महागाई गगनाला... जीवनाश्यक वस्तूंचे वाढते दर त्या तुलनेत शेतकर्यांच्या मालाला भाव नसल्यामुळे सर्वसामान्य शेतकर्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. वाढती महागाई आणि निसर्गाची बेपरवाई या कात्रीत सापडलेल्या शेतकर्यांना घर चालविणे म्हणजे जगन्नथाचा रथ ओढण्यासारखे झाले आहे.