नगर पंचायतींची अंमलबजावणी लांबणीवर?
By Admin | Updated: August 24, 2014 00:11 IST2014-08-23T23:41:44+5:302014-08-24T00:11:21+5:30
संजय कुलकर्णी ,जालना जिल्ह्यात चार ग्रामपंचायतींना नगर पंचायतींचा दर्जा देण्यात येणार आहे. मात्र त्याबाबतची अंमलबजावणी आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमुळे लांबणीवर

नगर पंचायतींची अंमलबजावणी लांबणीवर?
संजय कुलकर्णी ,जालना
जिल्ह्यात चार ग्रामपंचायतींना नगर पंचायतींचा दर्जा देण्यात येणार आहे. मात्र त्याबाबतची अंमलबजावणी आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमुळे लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात एकूण आठ तालुक्यांचा समावेश आहे. त्यापैकी जालना, अंबड, भोकरदन व परतूर येथे नगरपालिका अस्तित्वात आहेत. मात्र बदनापूर व जाफराबाद या जुन्या तसेच मंठा व घनसावंगी या गेल्या पंधरा वर्षात झालेल्या नवीन तालुक्याच्या ठिकाणी अद्यापही ग्रामपंचायती आहेत. शासनाच्या निर्णयानुसार या चारही ग्रामपंचायतींना नगर पंचायतींचा दर्जा मिळणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीचा, ग्रामसभेचा व जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा ठराव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे पाठविण्यात आलेला आहे. त्यामुळे आता नगर पंचायतींची अंमलबजावणी केव्हा होणार, याची चर्चा उत्सुकतेने या भागात होत आहे.
जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी काही दिवसांपूर्वीच या चारही ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवकांची बैठक घेऊन ग्रामपंचायतींना आता नगर पंचायतींचा दर्जा मिळणार असल्याने त्यासाठीची पूर्वतयारी करण्याची सूचना केली. ग्रामपंचायतीचे उत्पन्न, खर्च, कर्ज, मालमत्तासंबंधीची माहिती तसेच अन्य आवश्यक बाबींचे संकलन करून एकत्रित माहिती सादर करावी, असेही सांगण्यात आले. नगर पंचायतींचा दर्जा मिळणार असल्याने बदनापूर, जाफराबाद, घनसावंगी व मंठा येथील स्थानिक लोकप्रतिनिधीही जोमाने कामाला लागले आहेत. तर जिल्हा परिषद सदस्य आपले पद जाणार किंवा नाही, याबाबतची चाचपणी करत आहेत. नगर पंचायतींमुळे आगामी काळात शहराचा चेहरामोहरा बदलणार असल्याने या भागातील नागरिकांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.
नगर पंचायतींच्या अस्तित्वामुळे काही जिल्हा परिषद सदस्यत्वांचे पद जाणार, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहे. मात्र ज्या चार ग्रामपंचायतींना नगर पंचायतींचा दर्जा दिला जाणार आहे, तेथील जि.प. सदस्यांचे पद जाईलच असे नाही.
ग्रामपंचायती असलेल्या गावाची लोकसंख्या त्या तालुक्यातील इतर गावांच्या तुलनेत अधिक असेल तर पद जाणार नाही, असेही सूत्रांनी सांगितले. मात्र, तरीही काही सदस्यांमध्ये भीती कायम आहे.