समृद्धीवरील खिळ्यांचे गूढ उलगडले: घातपात नाही, दुरुस्ती करताना कंत्राटदारांचा निष्काळजीपणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 15:25 IST2025-09-10T15:24:17+5:302025-09-10T15:25:38+5:30
समृद्धी महामार्गावरील घटनेवर एमएसआरडीसीकडून स्पष्टीकरण; कंत्राटदारावर कारवाई होणार

समृद्धीवरील खिळ्यांचे गूढ उलगडले: घातपात नाही, दुरुस्ती करताना कंत्राटदारांचा निष्काळजीपणा
छत्रपती संभाजीनगर: 'समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून घातपाताचा प्रयत्न?' अशा शिर्षकाखाली प्रसारित झालेल्या काही बातम्या आणि सोशल मिडियावरील व्हायरल व्हिडिओवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळने आता स्पष्टीकरण दिले आहे. महामार्गावर खिळे नव्हते, तर रस्त्यावरील सूक्ष्म तडे भरण्यासाठी वापरण्यात आलेले अॅल्युमिनियम नोजल्स होते. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावरही ते वेळीच न काढल्याने ही घटना घडली. या प्रकरणी संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याची माहिती एमएसआरडीसीच्या मुख्य अभियंता संगीता जैस्वाल आणि अधीक्षक अभियंता सुलिश श्रावगे यांनी दिली.
नेमकं काय घडलं होतं?
मागील रात्री छत्रपती संभाजीनगरजवळच्या सावंगी ते जांभळा इंटरचेंजदरम्यान अनेक गाड्यांचे टायर पंक्चर झाल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण होते. महामार्गावर खिळ्यांसारख्या वस्तू दिसल्याने हा घातपाताचा प्रयत्न असल्याचा आरोपही काही वाहनचालकांनी केला होता. या घटनेमुळे समृद्धी महामार्गाच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
डायव्हर्जन ओलांडून गाड्या नोजल्सवर
यावर स्पष्टीकरण देताना एमएसआरडीसीने आपल्या अहवालात सांगितले की, महामार्गावरील (साखळी क्रमांक ४४२+४६०) मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर रस्त्यात काही छोटे तडे गेले होते. त्याची दुरुस्ती करण्यासाठी 'Epoxy Grouting' पद्धतीने काम सुरू होते. या कामात तडे भरण्यासाठी अॅल्युमिनियमचे नोजल्स बसवावे लागतात. ९ सप्टेंबर रोजी रात्री ११:३० च्या सुमारास हे काम पूर्ण झाले. मात्र, वाहतूक वळवण्यासाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था पुरेशी नसल्याने आणि वेगाने येणाऱ्या काही गाड्या डायव्हर्जन ओलांडून थेट या नोजल्सवरून गेल्या. यामुळेच १० सप्टेंबर रोजी रात्री १२:१० च्या सुमारास ३ वाहनांचे टायर पंक्चर झाले. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा अपघात झालेला नाही.
निष्काळजीपणा कंत्राटदाराचा, कारवाईची तयारी
एमएसआरडीसीने आपल्या अहवालात स्पष्ट केले की, हे नोजल्स १० सप्टेंबर रोजी सकाळी ५:०० वाजता काढण्यात आले असून, सध्या वाहतूक सुरळीत सुरू आहे. मात्र, संबंधित ठिकाणी वाहतूक वळवण्यासाठी आणि सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात संबंधित कंत्राटदाराने हलगर्जीपणा केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे महामंडळ या प्रकरणी संबंधित कंत्राटदारावर कठोर दंडात्मक कारवाई करणार आहे. एमएसआरडीसीच्या या स्पष्टीकरणामुळे घातपाताची शक्यता मावळली असून, निष्काळजीपणामुळेच ही घटना घडल्याचे समोर आले आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका
समृद्धी महामार्गावरील ५४ किमीच्या पॅचच्या नियमित देखभाल आणि दुरुस्तीचे काम सुरू मागील काही दिवसांपासून सुरू आहेत. लेननंबर १ वर काम सुरू होते. लेन २, ३ सुरू होते. यासाठी नोजल्स बसवून त्याद्वारे केमिकल त्यातून सोडत महामार्गाचे आयुष्य वाढवले जाते. मंगळवारी सकाळी या ठिकाणी लावण्यात आले होते, त्यानंतर २४ तासांनी काम झाल्यानंतर ते काढण्यात आले आहे. दरम्यान, मध्यरात्री येथे दुरुस्ती सुरू असलेल्या लेनमधून गाड्या गेल्याने पंक्चर झाल्या. घटना झाली तेव्हा लागलीच एचएसपी आणि दौलताबाद पोलिस दाखल झाले. यापुढे जेव्हा देखभाल आणि दुरुस्तीचे कामे करण्यात येतील त्यावेळी रिफ्लेक्टर, बॅरीकेट लावून कामे होतील याची काळजी घेण्यात येईल. अफवांवर विश्वास ठेवू नका.
- प्रशांत स्वामी, पोलिस उपायुक्त