माझी स्मार्ट बस ठरली देशातील सर्वांत स्वस्त शहर बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:09 IST2021-01-13T04:09:33+5:302021-01-13T04:09:33+5:30
औरंगाबाद : शहरातील प्रवाशांच्या सोईसाठी सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट सिटी बसने अल्पवधीतच भरारी घेत, कमी किमतीमध्ये प्रवाशांना निश्चित स्थळी ...

माझी स्मार्ट बस ठरली देशातील सर्वांत स्वस्त शहर बस
औरंगाबाद : शहरातील प्रवाशांच्या सोईसाठी सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट सिटी बसने अल्पवधीतच भरारी घेत, कमी किमतीमध्ये प्रवाशांना निश्चित स्थळी पोहोचवून त्यांचा प्रवास सुखकर केला आहे. स्मार्ट बसच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवाशांच्या सोयीसाठी ई-तिकिट, स्मार्ट कार्डसह विविध योजना हाती घेण्यात आल्या. त्यामुळे आतापर्यंतच्या स्मार्ट सिटीबसच्या या वाटचालीची दखल घेण्यात आली आहे. इंडिया स्मार्ट सिटी अवॉर्ड्स कॉन्टेन्ट (आयएसएसी) २०२१च्या अंतिम यादीत स्मार्ट सिटी बसची निवड झाली आहे. औरंगाबादकरांसाठी ही गौरवास्पद बाब मानली जात आहे.
कोरोना संसर्गाच्या लॉकडाऊननंतर नोव्हेंबर, २०२० मध्ये स्मार्ट सिटी बस नव्याने सुरू झाली. महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सूक्ष्म नियोजन करून स्मार्ट सिटी बसचा फायदा अधिकाधिक प्रवाशांना कशा प्रकारे होईल, यासाठी प्रयत्न करत यंत्रणा कामाला लावली. औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन लिमिटेडने (एएससीडीसीएल) कॅशलेस पेमेंट्ससाठी स्मार्ट कार्ड, वाहन ट्रॅकिंग सीस्टम (व्हीटीएस), प्रवाशांना सवलतीच्या दरात प्रवास अशा अनेक नावीन्यपूर्ण योजना आणल्या. सोबतच मोबाइल अॅपमध्ये माहिती प्रणाली (पीआयएस), वेळेवर बससेवा (ईटीए), पोर्टलवर प्रवाशांची तक्रार, मार्गनिहाय टाइम टेबल आणि प्रवाशांना त्यांच्या बजेट अनुकूल भाडेसह साप्ताहिक, मासिक आणि त्रैमासिक पासेस सुरू केल्या. प्रवाशांच्या सोईसाठी अत्याधुनिक बसथांबेही उभारले जात आहे. १०० अत्याधुनिक बसस्थांबे बसविण्यात आले. ५० बस शहरातील २० नव्या मार्गांवर सध्या धावत आहेत. सर्व वेगळ्या सुविधांसह माझी स्मार्ट बस शहरातील सर्वात स्वस्त सार्वजनिक वाहतुकींपैकी एक ठरली असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे दखल
शहरांना त्यांच्या प्रकल्प, अंमलबजावणी आणि नावीन्यपूर्ण कामगिरीबद्दल गौरव करण्यासाठी २५ ऑगस्ट, २०२० रोजी इंडिया स्मार्ट सिटीज अवॉर्ड्स कॉन्टेस्ट (आयएसएसी) सुरू करण्यात आली. त्यात औरंगाबादच्या माझी स्मार्ट बसच्या स्मार्ट सिटी अवॉर्डसाठी अंतिम यादीत समावेश झाला आहे.