‘माझ्या जीवनातील स्नेही मी तुम्हाला देत आहे’, बाबासाहेबांची ११०० ग्रंथ मिलिंदच्या ग्रंथालयात

By विजय सरवदे | Published: December 6, 2022 01:36 PM2022-12-06T13:36:46+5:302022-12-06T13:38:02+5:30

ग्रंथप्रेमी बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः तयार केली होती ग्रंथालयाची नियमावली

'My life's friends I am giving you', 1100 books of Prajnasurya Dr. Babasaheb Ambedkar's in Milind College's library | ‘माझ्या जीवनातील स्नेही मी तुम्हाला देत आहे’, बाबासाहेबांची ११०० ग्रंथ मिलिंदच्या ग्रंथालयात

‘माझ्या जीवनातील स्नेही मी तुम्हाला देत आहे’, बाबासाहेबांची ११०० ग्रंथ मिलिंदच्या ग्रंथालयात

googlenewsNext

- विजय सरवदे
औरंगाबाद :
विद्यार्थी व प्राध्यापकांनी पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त संबंधित विषयांचे सखोल ज्ञान प्राप्त करण्यासाठी पूरक ग्रंथांचे वाचन करावे, यासाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘सिद्धार्थ’ व ‘मिलिंद’ची ग्रंथालये ग्रंथांनी समृद्ध केली. डॉ. बाबासाहेबांनी त्यांच्या संग्रहातील सुमारे ११०० दुर्मीळ ग्रंथ सुरुवातीच्या काळात मिलिंद महाविद्यालयाच्या ग्रंथालयात ठेवले होते. हे ग्रंथ प्राध्यापक व विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध व्हावेत आणि त्यांचे योग्य संवर्धनही व्हावे यासाठी त्यांनी स्वत:च एक नियमावली तयार केली होती. ते ग्रंथ आजही मिलिंद महाविद्यालयाच्या ग्रंथालयात उपलब्ध आहेत.

बाबासाहेबांनी ८ जुलै १९४५ रोजी ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ ही शिक्षण संस्था स्थापन केली. या संस्थेचे मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालय, तर औरंगाबादेत मिलिंद महाविद्यालय सुरू केले. या माध्यमातून त्यांनी सर्वच जाती-धर्माच्या मुला-मुलींसाठी उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. समाजातील मुले शिकली. नोकरीलाही लागली; पण ती नंतर स्वतःच्याच कुटुंबात, ऐशोआरामात मग्न झाली. बाबासाहेबांना हे अपेक्षित नव्हते. ‘पदवी मिळविण्यासाठी तुम्ही पाठ्यपुस्तकांचा अभ्यास करता; पण पदवी हेच ध्येय मानू नका. ज्ञानप्राप्ती हे ध्येय ठेवा. जीवनभर ज्ञानाची उपासना करा’, बाबासाहेबांचा असा आग्रह समाजातील नवतरुणांसाठी होता.

१९५२ साली सिद्धार्थ महाविद्यालयास आपला बहुमोल ग्रंथसंग्रह प्रदान करताना डॉ. बाबासाहेब अत्यंत भावविवश झाले होते. ‘समाजाने बहिष्कृत केलेल्या माझ्यासारख्याला या ग्रंथांनीच जवळ केले. मला आसरा दिला. त्यांच्या एवढा जगात मला दुसरा परमस्नेही कोणीच नाही. माझ्या जीवनातील स्नेही आज मी तुम्हाला देत आहे’, असे उद्गार बाबासाहेबांनी तेव्हा काढले. आपली ३५ हजारांहून अधिक असलेली ग्रंथसंपदा ठेवण्यासाठी त्यांनी मुंबईत एक स्वतंत्र बंगला ‘राजगृह’ बांधला होता.

डॉ. बाबासाहेबांची ग्रंथालयासंदर्भात नियमावली
वाचन कसे करावे, याविषयीदेखील बाबासाहेब विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचे. २८ ऑक्टोबर रोजी बाबासाहेबांनी ग्रंथालयातील पुस्तकांचे वितरण आणि तेथे वाचण्यासाठी एक नियमावली तयार केली. ती आजही प्रत्येक ग्रंथालयांसाठी अनुकरणीय आहे. 'मार्क केलेले ‘नॉट फॉर इश्यू’ आणि सर्व ‘रेफरन्स बुक’ ही पुस्तके ग्रंथालयाबाहेर देऊ नयेत, प्राध्यापक आणि ज्या विद्यार्थ्यांनी १० रुपये देऊन ग्रंथालयात नोंद केली आहे, त्यांनाच पुस्तके वितरित करावीत, पुस्तके जमा करताना ग्रंथपालांनी त्या पुस्तकांचे बारकाईने निरीक्षण करावे. पुस्तकातील पाने फाडलेली असतील अथवा पानांवर अंडरलाइन केलेली असेल, तर अशी पुस्तके जमा करून न घेता संबंधितांकडून पुस्तकाची पूर्ण किंमत वसूल करावी, प्राध्यापकांना दोनपेक्षा जास्त पुस्तके देऊ नयेत, प्राध्यापकांनी चार दिवसांत नेलेली पुस्तके जमा करावीत, एखादे पुस्तक परत करण्यासाठी ग्रंथपालाने नोटीस काढल्यास ते पुस्तक दोन दिवसांत ग्रंथालयात जमा करावे. त्या अवधीत परत केले नाही, तर त्यास दरदिवशी आठ आणे दंड आकारावा, या व्यतिरिक्त विद्यार्थ्याला ग्रंथालयातच अभ्यास करायचा असेल, तर त्याच्याकडून महिन्याला दोन रुपये आगाऊ रक्कम आकारावी. बाबासाहेबांनी घालून दिलेली नियमावली किती दूरदृष्टीपणाची होती यावरून कळते.

समाजाला शिक्षणाचा मूलमंत्र दिला
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय संघर्षातून शिक्षण घेतले. आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जाेरावर ते जागतिक दर्जाचे अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडित, समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासकार, शिक्षणतज्ज्ञ, धर्मशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, समाजसुधारक, बॅरिस्टर, पत्रकार, जलतज्ज्ञ, उत्कृष्ट संसदपटू, स्त्रियांचे कैवारी याशिवाय ते भारत देशातील कोट्यवधी शोषित- पददलितांचे उद्धारक, स्वतंत्र भारताचे पहिले ‘कायदा मंत्री’ आणि राज्यघटनेचे शिल्पकार ठरले. अस्पृश्य केलेल्या समाजातून हा माणूस एवढा मोठा होतो? ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते जो प्राशन करेल, तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही’, बाबासाहेबांनी असे या समाजव्यवस्थेला सडेतोड उत्तर दिले. आपल्या समाजाला शिक्षणाचा मूलमंत्र दिला आणि समाजाने त्याचे पालनही केले.

Web Title: 'My life's friends I am giving you', 1100 books of Prajnasurya Dr. Babasaheb Ambedkar's in Milind College's library

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.