'मागासलेपण सिद्ध तरी मुस्लीम वंचित'; आरक्षणासाठी खासदार ओवैसींची 'चलो मुंबई'ची हाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2021 18:36 IST2021-11-18T18:32:33+5:302021-11-18T18:36:16+5:30
MIM Asaduddin Owaisi : मुस्लिम समाजाचे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण उच्च न्यायालयात सिद्ध झाले आहे.

'मागासलेपण सिद्ध तरी मुस्लीम वंचित'; आरक्षणासाठी खासदार ओवैसींची 'चलो मुंबई'ची हाक
औरंगाबाद : मुस्लिम समाजातील ५२ जातींचे मागासलेपण ( Muslim Reservation ) उच्च न्यायालयात सिद्ध झाले आहे. असे असताना मुस्लिमांना अद्याप आरक्षण देण्यात आले नाही. हा मुद्दा घेऊन मुसलमान समाज डिसेंबर महिन्यात मुंबईला धडकणार आहे, अशी माहिती एमआयएम प्रमुख खा. असदुद्दीन ओवैसी (MIM Asaduddin Owaisi )यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्रातील मुसलमान समाजाचा विकास या विषयावर सेंटर फॉर डेव्हलपमेंट अँड प्रॅक्टिस आणि दुवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज शहरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये मुस्लिम परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी खा. ओवैसी यांनी पत्रकारांशी संवाद साधला, ते म्हणाले की, राज्यातील अत्यल्प मुस्लिम समाजाकडे पाच एकरपेक्षा कमी जमीन आहे, पदवीपर्यंत शिक्षणातही मुस्लिम समाज दहा टक्क्यांच्या खाली आहे. मुस्लिम समाजाचे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण उच्च न्यायालयात सिद्ध झाले आहे. राज्यातील यापूर्वीच्या भाजप सरकार व आताच्या महाविकास आघाडी सरकारने मुस्लिम समाजावर अन्याय केला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी आम्ही डिसेंबर महिन्यात मुंबईत मोठ्या संख्येने जाऊ, असा इशारा त्यांनी दिला.
राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनात मुस्लिम आरक्षणाचा कायदा मंजूर करावा, अशी मागणी त्यांनी केली. यासोबतच वक्फ मालमत्तेचे रक्षण होण्यासाठी संपूर्ण राज्यात जनजागरण करणार असल्याचे ही खा. ओवैसी म्हणाले. यावेळी मुस्लिम समाजाच्या विकासासाठी विविध मुद्द्यांवर पाठपुरावा केला जाईल, असे खा. इम्तियाज जलिल यांनी नमूद केले. या पत्रकार परिषदेला आमदार वारीस पठाण, शहराध्यक्ष डॉ. गफार कादरी, शारेक नक्षबंदी आदी उपस्थित होते.