पूर्व वैमनस्यातून मित्रानेच केला वसुली एजंटचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 16:20 IST2020-10-28T16:18:18+5:302020-10-28T16:20:52+5:30
आपसातील वैमनस्य आणि अनैतिक संबंधातून खून

पूर्व वैमनस्यातून मित्रानेच केला वसुली एजंटचा खून
औरंगाबाद : खाजगी बँकेचा वसुली एजंट मंटुसकुमार सिंग ऊर्फ माँटिसिंग अनिलकुमार (रा. पीस होम सोसायटी, मिटमिटा) याचा खून करून फरार झालेल्या त्याच्या मित्राला छावणी पोलिसांनी दौंड (पुणे) येथील कुरकुंभ येथे पकडले. आपसातील वैमनस्य आणि अनैतिक संबंधातून हा खून करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील यांनी दिली.
कपिल राजीव रापते (२५, रा. बीड बायपास परिसर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. पोलीस उपायुक्त म्हणाले मंटुसकुमार सिंग ऊर्फ माँटीसिंग ची १९ ऑक्टोबरच्या रात्री त्याच्या मिटमिटा येथील फ्लॅटमध्ये भोसकून हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर मारेकरी फ्लॅटला लॅच लॉक करून पसार झाला होता. २१ रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मयताचा मित्र विशाल मदन दामोदर (रा. पडेगाव) याने छावणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. मृताचे एका तरुणीसोबत अनैतिक संबंध होते. त्याच तरुणीचे आरोपीसोबतही संबंध होते. तिच्यावरून माँटिसिंगसोबत त्याचा वाद होता. यातून त्यांच्यात वैमनस्य निर्माण झाले होते.
घटनेच्या काही दिवसांपूर्वी मृताने त्यांच्यासोबत राहणाऱ्या तरुणीला मारहाण केली होती. ही बाब आरोपी कपिलला तिने सांगितली होती. तेव्हा त्यामुळे त्यांच्यात पुन्हा भांडण झाले असता माँटिसिंगने त्याला शिवीगाळ केली होती. याचा कपिलला राग आला होता. १८ रोजी रात्री कपिल मिटमिटा रोडवरील एका ढाब्यावर जेवायला गेला होता. तेथून जेवण आटोपून तो माँटीसिंगच्या घरी गेला आणि त्याने त्याचा खून केला. यानंतर फ्लॅटला कुलूप लावून तो पसार झाला होता. आरोपी पुण्याला असल्याचे समजताच तो दुबईला पळून जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी लूक आऊट नोटीस जारी केली होती.
पाच दिवस पोलीस पथक होते पुण्यात
पुण्यात एका वाटसरूचा मोबाईल घेऊन त्याने बहिणीला फोन केला होता. यामुळे तो पुण्यात असल्याचे समजल्याने सहायक आयुक्त विवेक सराफ, निरीक्षक मनोज पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन वायाळ, हवालदार नागरगोजे, शिंदे, चिंधाळे, थोरात आणि पायघण यांचे पथक पाच दिवसांपासून पुण्यात त्याचा शोध घेत होते. पुण्यातील ताठेवाडी, पिंपरी चिंचवड आदी ठिकाणी त्याचे छायाचित्र घेऊन पोलीस त्याला शोधत होते. मंगळवारी अखेर तो कुरकुंभ येथे पोलिसांच्या हाती लागला.