नगरपालिका निवडणुकीचा आता उडणार बार; २८ दिवसांचा कार्यक्रम, यंत्रणा होणार बेजार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 14:35 IST2025-11-05T14:32:51+5:302025-11-05T14:35:01+5:30
१० नोव्हेंबरपासून ३ डिसेंबरपर्यंत प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीच्या कामकाजात असेल.

नगरपालिका निवडणुकीचा आता उडणार बार; २८ दिवसांचा कार्यक्रम, यंत्रणा होणार बेजार
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील सहा नगर परिषदा आणि १ नगर पंचायतीची निवडणूक होणार असून, त्या क्षेत्रात मंगळवारपासून आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व नगर परिषदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असून, हा कार्यक्रम पूर्णत: धावपळीचा असल्यामुळे निवडणुकीचे कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कुठलीही उसंत मिळणार नाही. शिवाय त्यांना प्रशिक्षण देखील घाई -घाईत द्यावे लागणार असून, २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ रोजी मतमोजणी असा कार्यक्रम असल्यामुळे यंत्रणा वैतागणार असल्याची प्रतिक्रिया प्रशासकीय वर्तुळात उमटतेय.
१० नोव्हेंबरपासून ३ डिसेंबरपर्यंत प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीच्या कामकाजात असेल. मतदान आणि मतमोजणीसाठी वेगवेगळे कर्मचारी नेमावे लागतील. तसेच मतदान यंत्र रात्रभर सांभाळून लगेच दुसऱ्या दिवशी मतमोजणी सुरू करावी लागणार असल्यामुळे प्रशासकीय यंत्रणेची धावपळ होणार आहे.
प्रचाराला दोन आठवड्यांचा कालावधी
उमेदवारांना प्रचाराला दोन आठवड्यांचा कालावधी असणार आहे. अ वर्ग नगर परिषद निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारास ५ लाख, ब वर्ग न.प. उमेदवारास ३ लाख ५० हजार, तर क वर्ग न.प. निवडणुकीतील उमेदवारास २ लाख ५० हजारांचा खर्च प्रचारासाठी करता येईल. तर, नगर पंचायतीसाठी प्रत्येक उमेदवारास २ लाख २५ हजारांचा प्रचार रणधुमाळीसाठी करता येईल.
निवडणुकीचा कार्यक्रम
उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात - १० नोव्हेंबर
अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत - १७ नोव्हेंबर
अर्जांची छाननी- १८ नोव्हेंबर
अपील नसलेल्या ठिकाणी अर्ज मागे घेण्याची मुदत - २१ नोव्हेंबर
अपील असलेल्या ठिकाणी अर्ज मागे घेण्याची मुदत -२५ नोव्हेंबर
मतदानाचा दिवस - २ डिसेंबर
मतमोजणीचा दिवस- ३ डिसेंबर
आचारसंहिता अशी असेल
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित नगर परिषद, पंचायत क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. न.प. कार्यक्षेत्रात आचारसंहिता लागू असली, तरी अन्य इतर ठिकाणीदेखील मतदारांवर प्रभाव पाडणारी घोषणा करता येणार नाही. आचारसंहितेत शासनाला धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत. नैसर्गिक आपत्तीबाबत करावयाच्या उपाययोजना, मदतीला आचारसंहितेचा आडकाठी असणार नाही.
जिल्ह्यातील किती नगर परिषदांच्या निवडणुका?
नगर परिषद...................वर्ग.............प्रभाग संख्या.....सदस्य......महिला राखीव........ मतदारसंख्या..........
सिल्लोड...............ब........................१४..................२८.........१४.....................५४,८०८
वैजापूर...............ब............................१२...............२५..........१३......................४२,३३४
पैठण..................ब.......................१२..................२५...........१३.......................३७,५४९
कन्नड...........ब..........................१२..................२५...........१३.........................३७,७८०
गंगापूर........क.............................१०................२०.............१०.........................२९,२८७
खुलताबाद.....क........................१०.................२०............१०.............................१४,७७५
फुलंब्री (नगर पंचायत)...............१७...............१७............९..................................१७,६३०
एकूण...................................८७................१६०...........८२..............................२,३४,१६३
जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा
नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर होताच, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी तातडीने आढावा घेतला. नगरपालिका प्रशासन, मुख्याधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व यंत्रणेला त्यांनी सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.