सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल आला तरी महापालिका निवडणूक दिवाळीनंतरच शक्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 17:35 IST2025-02-26T17:32:16+5:302025-02-26T17:35:01+5:30
ओबीसी आरक्षणाचा सर्वोच्च न्यायालयात निकाल लागला तरी प्रक्रियेला वेळ लागणार

सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल आला तरी महापालिका निवडणूक दिवाळीनंतरच शक्य!
छत्रपती संभाजीनगर : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर पुढील सुनावणी ४ मार्चला होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले. त्यामुळे पुढील आठवड्यात आरक्षणासंदर्भात अंतिम निकाल आला तरी या उन्हाळ्यात (दि. ३१ मेपूर्वी) मनपा निवडणूक घेणे अशक्य आहे. राज्यातील सर्व महापालिकांच्या निवडणुका दिवाळीनंतरच होऊ शकतात, असे निवडणूक विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेची निवडणूक मागील पाच वर्षांपासून झालेली नाही. दोन वेळेस निवडणूक घेण्यासंदर्भात राज्य निवडणूक विभागाने हालचाली केल्या. मात्र, निवडणूक घेतली नाही. ४ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटला तरी ३१ मेपर्यंत निवडणूक घेणे शक्य नाही. ९० दिवसांत निवडणुकीची प्रक्रियाच होऊ शकत नाही, असे राज्य निवडणूक आयोगातील काही निवृत्त अधिकाऱ्यांनी नमूद केले. निवडणुकीसाठी प्रभाग तयार करणे, प्रारूप प्रभाग आराखडा प्रसिद्ध करणे, त्यावर सूचना हरकती मागविणे. त्यानंतर हा आराखडा अंतिम करण्यासाठी बराच कालावधी लागतो. पुढील महत्त्वाचा टप्पा म्हणजे निवडणूक कार्यक्रम किमान ४५ ते ५० दिवसांचा ठेवावा लागतो. कितीही जलद गतीने काम केले तर पुढील काही दिवसांत निवडणुका घेणे अशक्यप्राय असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सहा ते आठ महिने कालावधी
सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणासंदर्भात ४ मार्च रोजी निर्देश प्राप्त झाल्यानंतर राज्य शासनाला निर्णय घ्यावा लागेल. त्यानंतर राज्यातील सर्वच महापालिकांमध्ये पुढील प्रक्रिया सुरू करण्यासाठी निर्देश द्यावे लागतील. अत्यंत शांततेत ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी किमान सहा ते आठ महिन्यांचा अवधी हमखास लागतोच असे सूत्रांचे म्हणणे आहे.
इच्छुकांचे लक्ष ४ मार्चकडे
माजी नगरसेवकांसह विविध पक्षांतील कार्यकर्तेही निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. ४ मार्चला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय येईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.