महापालिका आकर्षक बोधचिन्हांद्वारे जपणार ऐतिहासिक वारसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 16:26 IST2020-12-02T16:24:52+5:302020-12-02T16:26:53+5:30
शहरातील प्रत्येक वसाहतींत इतिहासाच्या खाणा-खुणा पाहायला मिळतात.

महापालिका आकर्षक बोधचिन्हांद्वारे जपणार ऐतिहासिक वारसा
औरंगाबाद : केंद्र शासनाने स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत औरंगाबाद महापालिकेला आतापर्यंत जवळपास तीनशे कोटी रुपये दिले आहेत. यातील चार कोटी रुपये हेरिटेज संवर्धनासाठी ठेवले असून, या उपक्रमांतर्गत शहरात दहा ठिकाणी आकर्षक बोधचिन्ह बसविण्याचे काम स्मार्ट सिटी कंपनीमार्फत सुरू आहेत. मंगळवारी खडकेश्वर येथे ‘लव्ह खडकी’ नावाने बोधचिन्ह बसविण्यात आले.
चारशे वर्षांपूर्वी औरंगाबाद शहराला ‘खडकी’ या नावाने ओळखले जात होते. मुगल बादशाहा औरंगजेब यांनी शहरात अनेक वर्षे वास्तव्य केले. त्यामुळे शहराला औरंगाबाद असे नाव देण्यात आले. शहरातील प्रत्येक वसाहतींत इतिहासाच्या खाणा-खुणा पाहायला मिळतात. हा वारसा जपण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीने प्रयत्न सुरु केला आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील ९ ऐतिहासिक दरवाजांची डागडुजी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. मार्च अखेरपर्यंत हे काम होईल. या कामामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे.
स्मार्ट सिटी कंपनीने शहराच्या वेगवेगळ्या भागात आकर्षक बोधचिन्ह उभारण्याचा निर्णय अलीकडेच घेतला. ‘लव्ह औरंगाबाद’ या बोधचिन्हाचे लोकार्पण जळगाव रोडवर पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर जालना रोडवर अशाच पद्धतीचा एक बोर्ड उभारण्यात आला आहे. लवकरच अमरप्रित चौक, क्रांती चौक, व्हीआयपी रोडवर नाैबत-काळा दरवाजा यांच्यामधील खुल्या जागेत आकर्षक बोर्ड उभारणार आहेत. यासाठी वीस लाख रुपये खर्च येणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुष्कल शिवम यांनी दिली.