‘रेणुका शुगर’च्या हालचाली
By Admin | Updated: July 6, 2014 00:13 IST2014-07-05T23:54:18+5:302014-07-06T00:13:10+5:30
पाथरी : येथील रेणुका शुगर कारखाना चालू वर्षीच्या गळीत हंगामात सुरू होण्याच्या हालचाली कारखाना व्यवस्थापकाकडून सुरू करण्यात आल्या आहेत़

‘रेणुका शुगर’च्या हालचाली
पाथरी : येथील रेणुका शुगर कारखाना चालू वर्षीच्या गळीत हंगामात सुरू होण्याच्या हालचाली कारखाना व्यवस्थापकाकडून सुरू करण्यात आल्या आहेत़ माजी आ़ हरिभाऊ लहाने यांनी कारखान्याचा गळीत हंगाम सुरू करण्यासाठी कारखान्यावर सर्वपक्षीय मोर्चा काढल्यानंतर कारखान्याने पाऊल उचलले आहे़
पाथरी येथील रेणुका शुगर कारखाना कार्यक्षेत्रामध्ये जवळपास चार लाख मे़ टन ऊस उपलब्ध आहे़ गतवर्षी हा कारखाना सुरू झाला नव्हता़ मराठवाड्यात इतर कारखान्याकडे ऊस कमी असल्याने गतवर्षी या भागातील ऊस बाहेरील कारखान्यांनी गाळपास नेला होता़ त्यामुळे गतवर्षी ऊस गाळप करण्यास शेतकऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या नव्हत्या़ चालू वर्षीच्या गळीत हंगामात मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर उसाची उपलब्धता आहे़ यामुळे बाहेरील कारखाने आपापल्या भागातील ऊस गाळप करण्याच्या विचारात आहेत़ या भागातील रेणुका शुगर कारखाना चालू वर्षीच्या गळीत हंगामात सुरू होतो की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती़
रेणुका शुगर साखर कारखान्याचे व्यवस्थापन जळगाव येथून चालते़ कर्नाटकातील नामांकित रेणुका इन्स्टिट्युटच्या माध्यमातून हा कारखाना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार चालविला जात असला तरी कारखान्याच्या गळीत हंगामाबाबत मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पाथरीत बैठक घेऊन कारखान्यासंदर्भात माजी आ़ हरिभाऊ लहाने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाची भूमिका घेतली होती़ आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून कारखान्यावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा धडक मोर्चा नेण्यात आला़
यावेळी आठ दिवसांत कारखाना सुरू करण्या संदर्भात व्यवस्थापकाने निर्णय कळवावा, अन्यथा पुढील आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला होता़ त्यानंतर कारखान्याचे वरिष्ठ व्यवस्थापकातील अधिकाऱ्यांनी या कारखान्याला भेट देऊन कारखाना सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत़ कारखाना वेळेच्या आत सुरू झाला तर या भागातील शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागणार नाही़ (वार्ताहर)
लढा चालूच ठेवणार- लहाने
रेणुका शुगर साखर कारखाना सुरू झाला नाही तर या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे़ सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आल्यानंतर कारखाना व्यवस्थापनाला याबाबत वेळ देण्यात आला होता़ आठ दिवसानंतर कारखाना सुरू करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत़ यासंदर्भात माजी आ़ हरिभाऊ लहाने, अशोक गिराम, प्रभाकर शिंदे, विजय पाटील सिताफळ, गोविंद गायकवाड यांनी कारखान्याला भेट दिली़ वेळेत कारखाना सुरू व्हावा, यासाठी आपला लढा चालू राहील, अशी प्रतिक्रिया माजी आ़ हरिभाऊ लहाने यांनी दिली़
सुरू करण्याबाबत निर्णय-देशपांडे
चालू वर्षीच्या गळीत हंगामात कारखाना सुरू करण्यासाठी व्यवस्थापकाकडून तांत्रिक बाबी तपासून निर्णय घेतले जात आहेत़ लवकरच कारखान्याबाबत अधिकृत निर्णय होणार असल्याची माहिती या कारखान्याचे युनिट हेड देशपांडे यांनी दिली़