सासू-सुनेनं परिश्रमातून उभा केला रोजगार; वाळवण पदार्थातून कुटुंबाला मोठा आधार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 15:59 IST2025-03-25T15:58:14+5:302025-03-25T15:59:45+5:30
पाककला व्यावसायिक स्तरावर विकसित करून या सासू-सुनेनी कुटुंबाला मोठा आधार दिला आहे.

सासू-सुनेनं परिश्रमातून उभा केला रोजगार; वाळवण पदार्थातून कुटुंबाला मोठा आधार
वाळूज महानगर : उन्हाळ्यात काही लोकांना फिरायला जाण्याची घाई असते. तर काहींना गावी जाऊन आमरसावर ताव मारण्याची. पण, गृहिणींना काळजी असते, ती वर्षभराच्या साठवणीच्या वाळवणाची. आता उन्हाळा सुरू झाल्याने अनेक गृहिणी वाळवणाच्या कामाला लागल्या आहेत. वर्षभराच्या शेवया, कुरडई, पापडाची बेगमी केली जात आहे.
तांदूळ, गव्हाच्या कुरडईची मोठी मागणी असते. गव्हाची कुरडई आपला पारंपरिक पदार्थ आहे. सुनबाई आणि सासूबाई यांनी मिळून परिश्रमाने यातून उद्योग सुरू केला. पाहता पाहता बजाजनगर, वाळूज महानगर सिडको परिसरातील महिलांनी घरगुती बनविलेल्या कुरडई, पापडच्या ऑर्डर देऊन कामगाराच्या कुटुंबाला एक मोठा आधार दिला आहे.
पोट भरण्यासाठी लासूर परिसरातून वाळूज औद्योगिक क्षेत्रात पतीसह आलेल्या दीपिका सचिन मुसळे यांनी त्यांच्या सासूसोबत कुरडई, पापड तयार करण्याची पाककला व्यावसायिक स्तरावर विकसित केली. वाळूज महानगरातील महिलांच्या पसंतीला ही वाळवणाची उत्पादने उतरल्याने त्यांचा व्यवसायात जम बसला. दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या गृहउद्योगाला आज चांगली मागणी आहे. कारण कारखान्यात रोजगाराला जाण्यासाठी आठ तासाचा कालावधी जातो. आपल्याला अवगत असलेल्या पाककलेला विकसित करून या सासू-सुनेनी कुटुंबाला मोठा आधार दिला आहे.
संपूर्ण कुटुंबाचा कामात हातभार
आता वाळूज महानगरात औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक, कामगार कुटुंबीयाकडून वाळवणाचे साहित्य बनवून घेण्यासाठी मदत करत आहेत. या कुटुंबाने बनवलेल्या वाळवणाची चव चांगली असल्याने अनेक गृहिणी पापड, कुरडई घेऊन जातात. आता तर संपूर्ण कुटुंबच या कामात हातभार लावत आहे. आर्थिक परिस्थिती इतकी चांगली नाही की मशीन विकत घेऊन रोजगार वाढवावा. परंतु, कोणत्याही बँकेने अजून कर्ज दिलेले नाही. त्यासाठी धडपड सुरू असल्याचे दीपिका मुसळे यांनी सांगितले.