बहुतांश ज्येष्ठ नागरिकांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 11:53 IST2020-10-01T11:53:07+5:302020-10-01T11:53:34+5:30
कोरोनाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठांना आहे. परंतु तरीही ८०- ९० वर्षांचे ज्येष्ठही या आजारावर यशस्वी मात करत आहेत, ही सकारात्मक बाब निदर्शनास येत आहे.

बहुतांश ज्येष्ठ नागरिकांची कोरोनावर मात
औरंगाबाद : कोरोनाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठांना आहे. परंतु तरीही ८०- ९० वर्षांचे ज्येष्ठही या आजारावर यशस्वी मात करत आहेत, ही सकारात्मक बाब निदर्शनास येत आहे. पण तरीही वृद्ध लोकांच्या आरोग्याची अधिक काळजी घेतली पाहिजे आणि त्यासाठी कुटुंबियांची भूमिका अधिक महत्त्वाची असल्याचे डॉक्टरांनी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनी सांगितले.
१ ऑक्टोबर हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो. वार्धक्यामुळे शरीर जीर्ण झालेले असते आणि त्यातच शारीरिक व्याधीही मागे लागतात. त्यामुळे वृद्धांना कोरोनाचा संसर्ग लवकर होऊ शकतो आणि त्यांचा आजार लवकरच गंभीर स्वरूप धारण करू शकतो. या वयातील ज्येष्ठ नागरिकांना उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, धमन्यांचे आजार, कर्करोग असे आजार असण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे ज्येष्ठांची काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांकडून होत आहे.
नैराश्य वाढू देऊ नका
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठांसाठी कुटुंबियांनी अधिक खबरदारी घेतली पाहिजे. घरातील कमी वयाच्या सदस्यांकडून ज्येष्ठांना गंभीर स्वरूपात कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका असतो. काळजी घेताना त्यांंना अडगळीत ठेवल्यासारखे वाटू देता कामा नये, नैराश्य वाढू न देता कुटूंबियांनी ज्येष्ठांची काळजी घ्यावी, असे वार्धक्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. मंगला बोरकर यांनी सांगितले.