छत्रपती संभाजीनगरात नो पार्किंगमधून दहा महिन्यांत २० हजारांहून अधिक वाहने उचलली
By मुजीब देवणीकर | Updated: June 26, 2024 19:28 IST2024-06-26T19:28:00+5:302024-06-26T19:28:30+5:30
वाहतूक पोलिस आणि मनपाच्या संयुक्त विद्यमाने शहरात दुचाकी वाहने अशा पद्धतीने उचलण्यात येतात.

छत्रपती संभाजीनगरात नो पार्किंगमधून दहा महिन्यांत २० हजारांहून अधिक वाहने उचलली
छत्रपती संभाजीनगर : शहरात रस्त्यावर दुचाकी, चारचाकी वाहने उभी राहतात. त्यामुळे वाहनधारक, पादचाऱ्यांना बराच त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्तरीत्या वाहने उचलण्याची माेहीम सुरू केली. मागील दहा महिन्यांत २० हजारांहून अधिक दुचाकी वाहने उचलण्यात आली. त्यातून मनपाला किमान १२ लाख रुपयांची रॉयल्टी मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
काही वर्षांपूर्वी वाहतूक पोलिस आपल्या वाहनांच्या माध्यमातून वाहने उचलत असत. या प्रक्रियेला विरोध झाल्याने मोहीम बंद पडली. शहरातील मुख्य रस्त्यांवर अस्ताव्यस्त वाहने परत लावणे सुरू झाले. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी पोलिसांनी महापालिकेला वाहने जप्त करण्यासाठी चारचाकी वाहनांची व्यवस्था, त्यावर कर्मचारी द्यावेत, अशी विनंती केली. महापालिकेने स्वतंत्र निविदा काढली. ॲक्टिव्ह मोटर्सला काम देण्यात आले. खासगी एजन्सीने कर्मचारी, वाहन दहा महिन्यांपूर्वी दिले. सध्या शहरातील विविध प्रमुख रस्त्यांवरील दुचाकी वाहने उचलण्यात येतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २० हजार वाहने आजपर्यंत उचलण्यात आली. प्रत्येक वाहनधारकाकडून पोलिस ५०० रुपये दंड वसूल करतात. त्यानंतर मनपा २०० रुपये वसूल करते. १५० रुपये कंत्राटदाराला आणि मनपाला ५० रुपये रॉयल्टी देण्यात येते. रॉयल्टीतून मनपाला १२ लाखांहून अधिकची रक्कम दहा महिन्यांत मिळाल्याचे सूत्रांनी नमूद केले.
महापालिका आणि पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई सुरू असली तरी अद्याप नागरिकांमध्ये शिस्त आलेली नाही. अनेक रस्त्यांवर आजही अस्तवेस्त वाहने उभी केली जातात. याचवेळी वाहतूक पोलिसांचे वाहन आले तर दुचाकी उचलून नेली जाते. अनेक रस्त्यांवर पट्टेही मारले आहेत. या पट्ट्यांच्या बाहेर वाहन असेल तरच उचलण्यात येते.
चारचाकी वाहनांचा प्रश्न
चारचाकी वाहने जप्त करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे दोनच टोईंग वाहने आहेत. आणखी पाच ते सहा टोईंग वाहनांची गरज आहे. मनपाने आणखी काही टोईंग वाहने खरेदी करून पोलिसांना देण्यासाठी प्रक्रिया सुरू केल्याचेही सूत्रांनी सांगितले. शहरातील मुख्य रस्त्यांवर सर्वाधिक चारचाकी वाहने उभी राहतात.