CoronaVirus: मराठवाड्यातील दीड हजारांहून अधिक गावांनी वेशीवरच रोखला कोरोना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 05:28 IST2021-04-21T05:27:55+5:302021-04-21T05:28:08+5:30

गाव करील ते राव काय करील; कोरोनामुक्तीचे रोल मॉडेल ठरताहेत छोटी गावे

More than one and a half thousand villages in Marathwada blocked Corona at the gates | CoronaVirus: मराठवाड्यातील दीड हजारांहून अधिक गावांनी वेशीवरच रोखला कोरोना

CoronaVirus: मराठवाड्यातील दीड हजारांहून अधिक गावांनी वेशीवरच रोखला कोरोना

लोकमत न्यूज नेटवर्क 
औरंगाबाद : राज्यात एकीकडे कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आणि वाढत्या मृत्युंमुळे भीतीचे वातावरण असतानाच दुसरीकडे काही गावांनी कोरोनाला आपल्या हद्दीत शिरकावही करू दिलेला नाही. मराठवाड्यातील तब्बल दीड हजारांहून अधिक गावांनी कोरोनाला वेशीबाहेरच ठेवले. ग्रामस्थांच्या निश्चयाने कोरोनामुक्तीचा आदर्श निर्माण केला.

नियमांचे काटेकोर पालन  
औरंगाबाद : इतर गावांतील नागरिकांना गावबंदी, मास्कचा वापर, शारीरिक अंतर, चाचण्यांवर भर यासारख्या उपाययोजनांची कटाक्षाने अंमलबजावणी करत जिल्ह्यातील ३०८ गावांनी कोरोनाला दूर ठेवले आहे. फुलंब्री तालुक्यातील वाहेगाव हे त्याचे एक उदाहरण. दीड हजार लोकसंख्येच्या या गावात कोरोनाचा नामोनिशाणही नाही. मास्क लावल्याशिवाय गावातील एकही नागरिक घराबाहेर पडत नाही. गावातील सर्व वयोवृद्धांचे लसीकरणही पूर्ण झालेले आहे.  


कडेकोट देखरेख 
हिंगोली : जिल्ह्यातील ७११ पैकी जवळपास २७० गावांमध्ये अजूनही कोरोनाचा स्पर्शही झालेला नाही. यात दुर्गम अथवा लहान गावांचाच प्रामुख्याने जास्त समावेश आहे. वसमत तालुक्यातील डोणवाडा हे गाव त्यापैकीच एक. डोणवाडा येथे गाव पातळीवर आवश्यक उपाययोजना, देखरेख कायम आहे. त्यामुळे गावात एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही.  

कोरोनामुक्तीचा आदर्श 
परभणी : जिल्ह्यातील ८०४ पैकी २२६ गावांत कोरोनाचा शिरकाव अजूनही झालेला नाही. पाथरी तालुक्यातील बाणेगाव, वरखेड, गंगाखेड तालुक्यातील गोदावरी तांडा या काही गावांनी आदर्श निर्माण केला आहे. गोदावरी तांडा येथील सरपंच सरुबाई चव्हाण यांनी सांगितले, बाहेरगावाहून आलेल्या एकाही नागरिकाला विना तपासणी गावात प्रवेश दिला नाही. ग्रामस्थांनी कोरोना रोखण्यासाठी घेतलेल्या काळजीमुळे हे शक्य झाले. 

जनजागृतीवर दिला भर
उस्मानाबाद : जिल्ह्यातील ७३३ पैकी १२७ गावांनी अढळ प्रयत्नांनी कोरोनाला रोखले आहे. यातील जायफळ हे एक उदाहरण. येथे प्रामुख्याने जनजागृतीवर भर दिला आहे. हॉटस्पॉट भागातून एखादा व्यक्ती आल्यास ग्रामस्थ त्याची कल्पना प्रशासनाला देतात. 

गावसीमेवर युवकांची फौज 
नांदेड : कोरोनाला दूर ठेवणाऱ्या २२८ गावांपैकी हदगाव तालुक्यातील कणकवाडीने आदर्शच घालून दिला आहे. पाचशे लोकवस्तीच्या या गावात अद्यापपर्यंत एकही बाधित रुग्ण आढळलेला नाही. कणकवाडी ग्रामस्थांनी युवकांची समितीच गावसीमेवर तैनात केली आहे. 

ग्रामपंचायतींची करडी नजर 
जालना : जिल्ह्यातील ९६४ गावांपैकी १५४ गावांमध्ये अद्याप कोरानाने शिरकाव केलेला नाही. भोकरदन तालुक्यातील तपोवन येथील सरपंच छाया रामलाल चव्हाण यांनी सांगितले की, आम्ही गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बाहेर गावांहून येणाऱ्यावर करडी नजर ठेवली. 

त्रिसूत्रीची प्रभावी अंमलबजावणी 
लातूर : जिल्ह्यात पहिला रुग्ण ७ एप्रिल २०२० रोजी आढळला होता. तेव्हापासून बाहेरगावी गेलेले परत आल्यानंतर किमान पाच ते सहा दिवस विलगीकरणात ठेवण्यात आले. आशा कार्यकर्ती घरोघरी जाऊन तपासणी करते. 

गाव सुरक्षेला प्राधान्य  
बीड : कोविड साथ सुरू झाल्यापासून आजपर्यंत जिल्ह्यात ११८ गावांमध्ये एकही रूग्ण आढळून आला नाही. सरपंच, ग्रामसेवक, ग्रामस्थांनी ही किमया केली. 

Web Title: More than one and a half thousand villages in Marathwada blocked Corona at the gates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.