'मनी लॉड्रींगची केस दाखल होतेय'; मुंबई सायबर क्राईमचा लोगो वापरून शिक्षिकेला केले ब्लॅकमेल
By बापू सोळुंके | Updated: April 22, 2023 20:07 IST2023-04-22T20:07:21+5:302023-04-22T20:07:38+5:30
सायबर भामट्यांनी ऑनलाईन ९८ हजार १३२ रुपयांचा घातला गंडा

'मनी लॉड्रींगची केस दाखल होतेय'; मुंबई सायबर क्राईमचा लोगो वापरून शिक्षिकेला केले ब्लॅकमेल
छत्रपती संभाजीनगर: मुंबई सायबर क्राईमचा लोगो वापरून सायबर भामट्याने शहरातील एका महिलेला तुझ्याविरोधात गुन्हा नोंद झाल्याचे धमकावले. शिवाय मनी लॉड्रींगची केस दाखल होत असल्याची भिती दाखवून ९८हजार १३२रुपये उकळल्याचे समोर आले आहे.६ एप्रिल रोजी झालेल्या या घटनेविषयी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार शिक्षिका ही कांचनवाडी येथील रहिवासी आहे. ६ एप्रिल रोजी सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास ती घरी असताना एका अनोळखी मोबाईल नंबरवरून तिला कॉल आला. तेव्हा त्यावर सायबर क्राईम मुंबई असा लोगो आला होता. कॉल करणाऱ्याने त्यांना सांगितले की, तुमच्या आधारकार्ड आयडी वरून मुंबई ते तैवान असे पार्सल जात आहे. या पार्सलमध्ये असलेल्या अनधिकृत सामानावरुन तुमच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. यासोबतच त्याच आधारकार्डवरून इतर बँकेत खाते उघडलेले आहेत. या खात्यामध्ये करोडो रुपये असल्याने तुमच्याविरोधात मनी लॉड्रींगची केस होत असल्याची भिती दाखविली.
यावेळी त्यांनी तिला मदत करण्याचा बहाणा करून त्यांनी दिलेल्या बँक खात्यात पैसे पाठविण्यास सांगितले. तक्रारदार यांनी घाबरून आरोपींच्या बँक खात्यात ९८हजार१३२ रुपये ऑनलाईन पाठविले. ही रक्कम पाठविल्यांनतर हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे त्यांना समजल्यानंतर त्यांनी सातारा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पेालिसांनी गुन्हा नोंदविला असून पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार या घटनेचा तपास करीत आहेत.