आई, आजोबा, मला पुन्हा दिसणार नाही का...? ‘श्वास’ची कहाणी पडद्यावरच नव्हे प्रत्यक्षातही

By संतोष हिरेमठ | Updated: May 16, 2025 17:53 IST2025-05-16T17:52:49+5:302025-05-16T17:53:26+5:30

जागतिक नेत्रकर्करोग जनजागृती सप्ताह विशेष: आईच्या कुशीत खेळणाऱ्या मुलांची दृष्टी कमी होऊ लागते, तेव्हा कुणालाही कल्पना नसते की, तो डोळा कायमचा हरवणार आहे.

Mom, Grandpa, will I never see you again...? The story of 'Breath' is not only on screen but also in reality. | आई, आजोबा, मला पुन्हा दिसणार नाही का...? ‘श्वास’ची कहाणी पडद्यावरच नव्हे प्रत्यक्षातही

आई, आजोबा, मला पुन्हा दिसणार नाही का...? ‘श्वास’ची कहाणी पडद्यावरच नव्हे प्रत्यक्षातही

छत्रपती संभाजीनगर : ‘आजोबा, मला पुन्हा दिसणार ना?’, ‘श्वास’ चित्रपटातला परशाचा हा प्रश्न आजही काळजाचा ठाव घेतो. पण, फक्त पडद्यावरच नव्हे तर प्रत्यक्षातही अनेक परशा रोज डोळ्यांच्या कर्करोगामुळे आयुष्याशी झुंजत आहेत... अगदी आपल्या शहरात, छत्रपती संभाजीनगरमध्ये! एकट्या शासकीय कर्करोग रुग्णालयात वर्षाकाठी नेत्र कर्करोगाची सुमारे ३० बालके दाखल होत आहेत. ‘आई, मला पुन्हा तुझा चेहरा दिसणार नाही का...?’ हा लहानग्यांचा प्रश्न आईच्या काळजात खोलवर जखम करतो.

दरवर्षी जगभरात ११ ते १७ मे दरम्यान नेत्रकर्करोगाविषयी जनजागृती करण्यासाठी सप्ताह साजरा केला जातो. आईच्या कुशीत खेळणाऱ्या मुलांची दृष्टी कमी होऊ लागते, तेव्हा कुणालाही कल्पना नसते की, तो डोळा कायमचा हरवणार आहे. शासकीय कर्करोग रुग्णालयात (राज्य कर्करोग संस्था) अशी अनेक मुले दरवर्षी दाखल होतात. त्यांना असतो ‘रेटिनोब्लास्टोमा’. म्हणजेच डोळ्याचा कर्करोग. दरवर्षी सरासरी ३० बालके नेत्रकर्करोगाचे उपचार घेतात. बहुतेक वेळा आजार उशिरा लक्षात येतो, जेव्हा डोळा वाचवणे अशक्य होते. काहींचा एक डोळा तर काहींच्या दोन्ही डोळ्यांची शस्त्रक्रिया करावी लागते. म्हणजे काहींना एक डोळा गमवावा लागतो, तर काहींना दोन्ही. जग पाहायच्या आधीच अंधाराची शिक्षा त्यांच्यासाठी ठरते. पण तरीही या बालवीरांचा लढा थांबत नाही.

कोणता हा आजार?
रेटिनोब्लास्टोमा हा डोळ्यात होणारा कर्करोग आहे. हा अनुवंशिकही असू शकतो. वयाच्या ५ वर्षांखालील मुलांमध्ये तो अधिक प्रमाणात आढळतो. डोळ्यात पांढरा चमकणारा ठिपका, पांढरे फूल पडले, असेही म्हटले जाते. सतत पाणी येणे, सूज, डोळा बाहेर आलेला दिसणे ही त्याची सुरुवातीची लक्षणे असतात.

११ मुलांचा अभ्यास
बाल कर्करोग विभागातील वरिष्ठ निवासी डाॅ. सागर वर्तक यांनी नेत्रकर्करोग झालेल्या बालकांसंदर्भातील रिसर्च पेपर नुकत्याच झालेल्या पुणे रिसर्च सोसायटीच्या परिषदेत सादर केला. त्यात या रिसर्च पेपरला पहिला क्रमांक मिळाला. किमोथेरपीमुळे नेत्र कॅन्सरची गाठ कमी होण्यास कशाप्रकारे मदत होते, यासंदर्भात ११ मुलांचा अभ्यास करण्यात आला.

तिसऱ्या स्टेजमध्ये येणारे अधिक
नेत्रकर्करोगाचे लवकर निदान झाल्यास डोळे वाचविणे शक्य होते. मात्र, आपल्याकडे कॅन्सरच्या तिसऱ्या स्टेजमध्ये येणाऱ्या बालकांचे प्रमाण अधिक आहे. वर्षभरात जवळपास ३० बालके नेत्रकर्करोगाचे येतात.
- डाॅ. अदिती लिंगायत, बाल कर्करोग विभागप्रमुख, शासकीय कर्करोग रुग्णालय.

Web Title: Mom, Grandpa, will I never see you again...? The story of 'Breath' is not only on screen but also in reality.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.