आॅरबीट कंपनीत मनसे कार्यकर्त्यांची तोडफोड
By Admin | Updated: May 8, 2014 00:29 IST2014-05-08T00:28:59+5:302014-05-08T00:29:27+5:30
वाळूज महानगर : महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी वाळूज औद्योगिक क्षेत्रातील आॅरबीट इलेक्ट्रोमेट कंपनीत धुमाकूळ घालून कामगारांच्या वेतनाचे १३ लाख रुपये लुटले.

आॅरबीट कंपनीत मनसे कार्यकर्त्यांची तोडफोड
वाळूज महानगर : महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी वाळूज औद्योगिक क्षेत्रातील आॅरबीट इलेक्ट्रोमेट कंपनीत धुमाकूळ घालून कामगारांच्या वेतनाचे १३ लाख रुपये लुटले. अपंग कामगार जखमी झाला असून तोडफोडीत जवळपास १० लाख रुपयांचे नुकसान झाले. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल रॉय (रा. औरंगाबाद) यांच्या आॅरबीट इलेक्ट्रोमेट प्रा. लि. कंपनीत सात मे रोजी दुपारी ३ ते साडेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला. मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप पा. बनकर, गंगापूर तालुका सचिव वसंत प्रधान, कृष्णा पाटील, दत्तू वाक्चौरे, अमोल थोरात हे अन्य ३० ते ३५ जणांसह स्कॉर्पिओ जीप (एम. एच.-२०, एस. सी. ७५४५), कार (एम. एच.-२०, सी. एल.-१२२२) व कारने (एम. एच.-२०, सी. बी. ९९९०), तर काही जण दुचाकीने कंपनीत आले. त्यांनी कामगारांना मारहाण केली. लाठ्याकाठ्या व दगडांनी तोडफोड सुरू केली. हल्लेखोरांनी आॅटोमॅटिक प्रोग्रामिंग मशीन, कंट्रोल ड्रायर, मशिनरीची तोडफोड व रॉ-मटेरियलची मोठ्या प्रमाणात नासधूस केली. चार संगणक व लॅपटॉप त्यांनी फोडले. या घटनेत जखमी झालेला रवींद्र बारस्कर या अपंग कामगाराला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपींत दिलीप पा. बनकर, दत्तू वाघचौरे आदी अनिल रॉय यांनी कामगारांच्या वेतनासाठी कंपनीत १२ लाख ८० हजार रुपये आणून ठेवले होते. या हल्लेखोरांनी जाताना ही रक्कम नेली. या प्रकरणी कंपनीचे व्यवस्थापक दादा प्रल्हाद घोंगडे (रा. मयूरपार्क रोड, औरंगाबाद) यांच्या फिर्यादीवरून दिलीप पा. बनकर, वसंत प्रधान, दत्तू वाक्चौरे, कृष्णा पाटील, अमोल थोरात यांच्यासह ३० ते ३५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त एस. बी. चौघुले, पोलीस निरीक्षक इंदलसिंग बहुरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तपास बहुरे करीत आहेत.