आमदार जैस्वालांची मागणी,‘डॉ. सुक्रेंची बदली कराच’; मंत्री शिरसाट म्हणाले,‘बदली होणार नाही’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 20:03 IST2025-06-06T20:01:55+5:302025-06-06T20:03:09+5:30

शिंदेसेनेतील आमदार आणि मंत्र्यांमधील अंतर्गत कलह यानिमित्ताने पुन्हा चव्हाट्यावर आला.

MLA Pradeep Jaiswal's demand, Dr. Sukre must be transferred; Minister Sanjay Shirsat said, 'Don't worry, there will be no transfer' | आमदार जैस्वालांची मागणी,‘डॉ. सुक्रेंची बदली कराच’; मंत्री शिरसाट म्हणाले,‘बदली होणार नाही’

आमदार जैस्वालांची मागणी,‘डॉ. सुक्रेंची बदली कराच’; मंत्री शिरसाट म्हणाले,‘बदली होणार नाही’

छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयाच्या अभ्यागत समितीचे अध्यक्ष आ. प्रदीप जैस्वाल यांनी अधिष्ठाता डाॅ. शिवाजी सुक्रे यांची बदली करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे लावून धरली आहे. दुसरीकडे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी गुरुवारी घाटीतील जिमखान्याच्या उद्घाटनप्रसंगी डाॅ. सुक्रे, काळजी करू नका, तुमची बदली होणार नाही, अशी ताकद दिली. शिंदेसेनेतील आमदार आणि मंत्र्यांमधील अंतर्गत कलह यानिमित्ताने पुन्हा चव्हाट्यावर आला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) जिमखाना इमारत व जिम साहित्याचे उद्घाटन पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले, अधिष्ठाता डाॅ. शिवाजी सुक्रे, शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डाॅ. अरविंद गायकवाड, डाॅ. एम. एस. बेग, हर्षदा शिरसाट, विजय वाघचौरे, मार्ड संघटनेचे अध्यक्ष डाॅ. ऋषिकेश देशमुख आदी उपस्थित होते. आ. जैस्वाल यांच्या सोहळ्यातील गैरहजेरीने शिंदेसेनेतील धुसफुसीवर नव्याने चर्चा सुरू झाली.

घाटीचे प्रभारी अधिष्ठाता डाॅ. शिवाजी सुक्रे यांच्या बदलीची सध्या सर्वत्र चर्चा आहे. मात्र, जिमखान्याच्या उद्घाटनप्रसंगी संजय शिरसाट म्हणाले, दोन वर्षांपूर्वीची घाटी आणि आताची घाटी यात खूप बदल झाला आहे. आता कोणी म्हणत नाही की, घाटी गरीब आहे. एक काळ असा होता की, डाॅ. सुक्रे की डाॅ. राठोड यांच्यामध्ये निवड करायची होती. त्यावेळी डाॅ. सुक्रेंची निवड केली. कोणतेही काम पॅशन म्हणून केले पाहिजे. ही दृष्टी इथे दिसते. डाॅ. सुक्रे, काळजी करू नका. तुमची बदली होणार नाही.

मी तलवार म्यान केलेली नाही : जैस्वाल
मी घाटीतील अनियमिततेप्रकरणी तलवार म्यान केलेली नाही. तेथील अनागोंदीची चौकशी करण्याच्या मागणीवर मी ठाम आहे. गुरुवारी जीमच्या उद्घाटनाचा कार्यक्रम अचानक ठेवला. मला निमंत्रण होते. मात्र, मी पाठदुखीमुळे जाऊ शकलो नाही. पालकमंत्री शिरसाट यांना बदली करण्याचे, थांबविण्याचे अधिकार आहेत. त्यांनी डॉ. सुक्रे यांना बळ दिले असले तरी मी तलवार म्यान केलेली नाही. माजी अभ्यागत समिती सदस्याच्या आरोपांच्या चौकशीची मागणी कायम आहे.
- प्रदीप जैस्वाल, आमदार

शिरसाट यांनी उचलले ‘डंबेल्स’, सुक्रेंनीही पेलले वजन
उद्घाटनानंतर संजय शिरसाट यांनी ‘डंबेल्स’ उचलले. यावेळी त्यांनी एक छोटे आणि एक मोठे डंबेल्स उचलले होते. संजय शिरसाट यांच्यासमोर डाॅ. शिवाजी सुक्रे यांनीही व्यायामशाळेतील एका मशीनवर वजन उचलले.

Web Title: MLA Pradeep Jaiswal's demand, Dr. Sukre must be transferred; Minister Sanjay Shirsat said, 'Don't worry, there will be no transfer'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.