एमजेपी, एनएचएआयने तांत्रिक बाबी ठेवल्या समितीपासून झाकून; पाणीपुरवठा योजनेचा बट्ट्याबोळ

By विकास राऊत | Updated: December 18, 2024 13:01 IST2024-12-18T12:57:44+5:302024-12-18T13:01:30+5:30

एनएचएआयला पैठण ते छत्रपती संभाजीनगर रोडचे काम पूर्ण करायचे आहे. पाणीपुरवठा योजनेचे कामही संपवायचे आहे. त्यामुळे तांत्रिक मुद्यांकडे दुर्लक्ष होत असून त्याचा परिणाम योजनेच्या कामावर होण्याची शक्यता आहे.

MJP, NHAI kept technical matters hidden from the committee; Water supply scheme of Chhatrapati Sambhajinagar in trouble | एमजेपी, एनएचएआयने तांत्रिक बाबी ठेवल्या समितीपासून झाकून; पाणीपुरवठा योजनेचा बट्ट्याबोळ

एमजेपी, एनएचएआयने तांत्रिक बाबी ठेवल्या समितीपासून झाकून; पाणीपुरवठा योजनेचा बट्ट्याबोळ

छत्रपती संभाजीनगर : शासनाकडून महत्प्रयासाने शहर पाणीपुरवठा योजना २०१९ च्या जुलै महिन्यात मंजूर करून घेण्यात आली. पाच वर्षे लोटली तरी अजूनही त्या जलवाहिनीचे काम पूर्ण झालेले नसून तांत्रिक मुद्यांवरून योजनेच्या कामावर संकट आले आहे. जलवाहिनी कामासाठी विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर मागील वर्षापासून तांत्रिक बाबी कुठल्याच संस्थेने समोर न आणता त्या झाकून ठेवल्या. परिणामी, योजनेचे काम लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जायकवाडीत जॅकवेल, शहरात जलकुंभ बांधण्यासह जलवाहिनीचे जाळे अंथरणे, धरणापासून नक्षत्रवाडीपर्यंत मुख्य जलवाहिनी टाकणे ही कामे शिल्लक राहिलेली असताना मनपा, जीवन प्राधिकरण, कंत्राटदारांच्या टोलवाटोलवीत पुढच्या सहा महिन्यांत योजनेचे काम पूर्ण होईल की नाही, यावर प्रश्नचिन्ह आहे. योजनेचे काम करणाऱ्या जीव्हीपीआर या कंत्राटदार संस्थेची फेब्रुवारी २०२४ पर्यंत दिलेली मुदत संपली आहे.

पहिल्याच टप्प्यात हे मुद्दे समोर का आले नाहीत?
महापालिका, एमजेपी, एनएचएआय, पोलिस, महावितरण, जिल्हाधिकारी, गौण खनिज, बांधकाम विभाग आदी सदस्यांची समिती आहे. तांत्रिक बाबींचे ज्ञान असलेल्या यंत्रणा चुकल्या आहेत. पहिल्या कि.मी. पासून तांत्रिक बाबी का समोर आणल्या नाहीत? २० कि.मी. पर्यंत काम होईपर्यंत संबंधित यंत्रणा काय करीत होत्या, असे प्रश्न आहेत. एनएचएआयला पैठण ते छत्रपती संभाजीनगर रोडचे काम पूर्ण करायचे आहे. पाणीपुरवठा योजनेचे कामही संपवायचे आहे. त्यामुळे तांत्रिक मुद्यांकडे दुर्लक्ष होत असून त्याचा परिणाम योजनेच्या कामावर होण्याची शक्यता आहे. १,८०० कोटी रुपयांचे काम आजवर झाले आहे. त्यामुळे उपाययोजना तातडीने झाल्या नाहीत तर योजनेचे काम ठप्प पडू शकते.

चूक कुणाची, बरोबर कोण हे तपासणार
कोर्ट नियुक्ती समिती योजनेवर देखरेख करीत आहे. आजवर जे काही निर्णय झाले, त्याची माहिती कोर्टासमोर मांडली आहे. आता जे मुद्दे समोर आले, ते समितीच्या समोर कुठल्याही संस्थेने मांडले नाहीत. आता तांत्रिक प्रमुखांनी समितीकडे वेळ मागितला आहे. त्यात उपाय निघू शकतो. एमजेपी, एनएचएआय एकमेकांना पत्र पाठविल्याचे दावे करीत आहेत. जलवाहिनी जायकवाडीतून सुरू होते तर रस्ता पैठणमधून सुरू होतो. यात तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष झाले असले तरी पर्यायी मार्ग शोधावा लागणार आहे. १ जानेवारी रोजी समितीची बैठक आहे. तर ६ जानेवारी कोर्टाची तारीख आहे. कोण चुकले, कोण बरोबर आहे, हे तपासण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

याेजनेच्या कामासाठी किती बैठका?
विभागीय आयुक्तांकडे योजनेच्या कामासाठी १० बैठका झाल्या.
खा. डॉ. भागवत कराड यांनी सहा बैठक घेतल्या.
खा. संदीपान भुमरे यांनीही चार बैठका घेतल्या.
मंत्री अतुल सावे यांनी स्पॉट व्हिजिट केली, तसेच खासदारांच्या बैठकीला ते होते.

सर्वानुमते उपाय निघेल
योजनेचे काम मुदतीत होईल, यासाठी सर्व मिळून प्रयत्न करतील. यात काहीतरी उपाय निघेलच. सर्व तांत्रिक यंत्रणा सक्षम आहेत. संयुक्त चर्चा करून त्यावर उपाय निघेल.
- दिलीप गावडे, विभागीय आयुक्त

योजनेच्या कामाची सद्यस्थिती...
योजनेची किंमत : २,७४० कोटी
आजवर किती अनुदान आले? : १,६०० कोटी
जीव्हीपीआरला किती दिले? : १,५०० कोटी
योजनेची कामाची मुदत : फेब्रुवारी २०२४

मुख्य जलवाहिनीचे काम : ३९ कि. मी.
शिल्लक राहिलेले काम : ५ कि. मी.

शहरात किती कि. मी. जलवाहिनी टाकल्या : १,९११ पैकी ८००
जलकुंभ किती बांधणार? : ५३
किती जलकुंभ बांधून पूर्ण? : ०८

शासनाच्या निदर्शनास आणून देणार
शहर पाणीपुरवठा योजनेच्या कामाबाबत सध्या जे काही चालले आहे, ते शासनाच्या निदर्शनास आणून देईन.
- अतुल सावे, मंत्री

Web Title: MJP, NHAI kept technical matters hidden from the committee; Water supply scheme of Chhatrapati Sambhajinagar in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.