अश्लील साईटच्या आहारी अल्पवयीन मुले
By Admin | Updated: June 27, 2014 00:27 IST2014-06-27T00:26:18+5:302014-06-27T00:27:44+5:30
उस्मानाबाद : आपली अल्पवयीन मुले-मुली स्मार्टफोनचा वापर करीत असतील, तर सावधानता बाळगा.

अश्लील साईटच्या आहारी अल्पवयीन मुले
उस्मानाबाद : आपली अल्पवयीन मुले-मुली स्मार्टफोनचा वापर करीत असतील, तर सावधानता बाळगा. कारण, ते पोर्न वेबसाईटस्च्या आहारी तर गेले नाहीत ना, याची खात्री करून घ्या. १० ते १९ वयोगटातील २८ टक्के मुला-मुलींनी अश्लील वेबसाईटस् पाहत असल्याचे कबूल केले. एवढेच नव्हे तर अन्य मित्र- मैत्रिणींनाही ते व्हिडिओ, फोटो शेयर करीत असल्याचेही सांगितले. ही धक्कादायक माहिती, लोकमतने उस्मानाबाद शहरात केलेल्या सर्वेक्षणातून उजेडात आली आहे. इंटरनेटच्या मायाजालात अल्पवयीनांचे बाल्यमन हरवत असल्याचेच यावरुन सिद्ध होते आहे.
‘मोबाईल आणि इंटरनेटचा वापर आणि किशोरवयीन बालके’ हा सर्वेक्षणाचा विषय होता. उस्मानाबाद शहरातील १० ते १९ वर्षांपर्यंतच्या अल्पवयीनांचा सर्व्हे करण्यात आला. यात सहभागी झालेल्यापैकी ४८ टक्के मुलांनी १० ते १३ या वयात मोबाईल आणि इंटरनेट वापरण्यास सुरवात केली. १३ ते १६ वर्षे वयोगटात इंटरनेट वापरण्यास सुरवात करणारांची संख्या २६ टक्के तर १६ ते १९ या वयोगटात मोबाईल आणि इंटरनेट वापरण्यास सुरवात केलेल्या मुलांची संख्या ३६ टक्के असल्याची माहिती पुढे आली. विशेष म्हणजे सर्व्हेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ४० टक्के मुले सोशल नेटवर्र्कींग साईटस्चा वापर करीत असल्याचेही दिसून आले. इंटरनेटचा वापर कशासाठी करता असा प्रश्न या मुलांना लोकमतने विचारला होता. २० टक्के तरुणांनी गाणे, गेम, व्हीडीओ करण्यासाठी इंटरनेटचा वापर करीत असल्याचे सांगितले. ३४ टक्के तरुण इंटरनेटच्या मदतीने शाळा, महाविद्यालयाच्या प्रोजेक्टसाठी वापर करीत असल्याचे दिसून आले. २६ टक्के मुलांनी केवळ वेबसाईट पाहण्यासाठी इंटरनेट वापरतो म्हणून सांगितले. तर २० टक्के मुलांनी इंटरनेटच्या माध्यमातून आपण चॅटींग करीत असल्याची कबुली दिली. चॅटींग करणाऱ्या या मुलांना आॅनलाईन चॅटींग कोणाशी करता असा सवाल केला असता, ६० टक्के मुलांनी ओळखीच्या मित्र-मैत्रिणीशी तर, ४० टक्के मुलांनी अनोळखी मित्र-मैत्रिणीशी चॅटींग करीत असल्याचे सांगितले.
गुगलचा वापर सर्वाधिक
‘मोबाईल आणि इंटरनेटचा वापर करणारी किशोरवयीन बालकांची सर्वाधिक पसंती गुगल या वेबसाईटला असल्याचे सर्व्हेक्षणातून दिसून आले. ३६ टक्के मुलांनी गुगल वापरतो म्हणून सांगितले. २६ टक्के मुले फेसबुकला पसंती देत आहेत. ८ टक्के मुले इंटरनेवर युट्यूब मध्ये गुंतलेली असतात तर ४ टक्के मुलांनी ट्टिरचा वापर करीत असल्याचे सांगितले. उर्वरीत २६ टक्के मुलांनी इतर साईटस वापरत असल्याचे सांगितले.
तज्ञ म्हणतात...
सर्वेक्षणातून अशी माहिती मिळाली की, गंमत म्हणून अनेकांच्या हातात आपल्या आई- वडिलांनी मोबाईल दिला. काही मुले तर पोर्न फिल्मच्या आहारी गेले आहेत. एवढेच नव्हे तर दिवसातून एकदातरी नवीन फिल्म बघितल्याशिवाय या मुलांची बेचैनी थांबत नाही. पालकांनी आपल्या मुलांच्या हातात मोबाईल द्यावा; पण आपल्यासमोर तो हाताळण्याची सक्ती करावी असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)
इंटरनेट आॅडिक्शन
मानसिक आजारात आता ‘इंटरनेट आॅडिक्शन’चा नव्याने समावेश झाला आहे. प्रौढांप्रमाणेच अल्पवयीन मुलेही इंटरनेटच्या अतिआहारी जात आहेत. यातून पोर्न व्हिडिओ पाहणे, ते पाठविणे, तसेच वेळ मिळेल तेव्हा चॅटिंग करणे, त्याशिवाय बेचैन होणे, अशी लक्षणे दिसून येतात. मोबाईलमुळे इंटरनेटचा वापर एवढा सोपा झाला आहे की, लहान मुलेही सहजपणे ते हातळत आहेत. इंटरनेटपासून रोखणे कठीण आहे. त्याच्या अतिवापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामाची जाणीव पालकांनी आपल्या पाल्यांना करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी लैंगिक शिक्षण देणे आवश्यक झाले आहे.
-डॉ. महेश कानडे, मानसोपचार तज्ज्ञ
पालकांनी तपासावा पाल्यांचा मोबाईल
स्मार्ट फोन हातात नसला की, ही मुले अस्वस्थ होतात. टच स्क्रीन फोन तर त्यांना अधिक अधीर बनवत आहे. टॉयलेटमध्ये जातानाही स्मार्ट फोन सोबत घेऊन जातो, असे काही मुलांनी सांगितले. एवढा अतिरेक झाला आहे. पालकांचे आपल्या पाल्याकडे होत असलेले दुर्लक्ष हेच यास कारणीभूत ठरत आहे. पालकांनी आपल्या पाल्यांच्या हातात कोणत्या वयात स्मार्ट फोन द्यावा, हे ठरवावे. स्मार्ट फोन घेऊन दिला तर इंटरनेटवर मुलगा काय करतो, यावरही जातीने सतत लक्ष ठेवणे आवश्यक आहे. दिवसातून एकदातरी त्यांनी मुलांचा मोबाईल तपासावा. पालकाचे लक्ष असले तर धाकाने मुले अश्लील फोटो, व्हिडिओ डाऊनलोड करून घेणार नाहीत.
असे केले सर्वेक्षण
लोकमतने उस्मानाबाद शहरातील १० ते १९ वर्षे वयोगटातील १०० शालेय मुला- मुलींशी संपर्क साधून त्यांच्याकडून प्रश्नपत्रिका भरून घेतली. त्यातून रँडम सॅम्पलिंग पद्धतीने सारणी, विश्लेषण, शोध आणि शेवटी निष्कर्ष काढण्यात आले.
इंटरनेटचा वापर वाढला
इंटरनेटचा वापर आज सर्वसामान्य झाला आहे. पूर्वी सोय नसलेले अनेकजण इंटरनेटसाठी नेट कॅफे मध्ये जात होते. मात्र स्मार्ट फोनमुळे इंटरनेटची उपलब्धता वाढली आहे. त्यामुळे मागील काही दिवसात त्याच्या वापरातही मोठी वाढ झाली आहे. मोेठ्या प्रमाणेच इंटरनेट वापरणाऱ्यात किशोरवयीन बालकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. याअनुषंगाने या तरुणांना विचारले असता, इंटरनेटचा दररोज वापर करणाऱ्या तरुणांची संख्या २० टक्के होती. १८ टक्के तरुणांनी आठवड्यातून एकदा इंटरनेटचा वापर करीत असल्याचे सांगितले. कधी-कधी वापर करतो असे सांगणारे १२ टक्के होते. तर ५० टक्के मुलांनी काम असेल तरच इंटरनेटचा वापर करतो असे सर्व्हेक्षणावेळी स्पष्ट केले.