शेतकरी संकटात असताना मंत्री सभागृहात खेळतात रमी; मंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या, विरोधक पडले तुटून

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 11:50 IST2025-07-21T11:48:38+5:302025-07-21T11:50:44+5:30

अशा असंवेदनशील कृषिमंत्र्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने राजीनामा घ्यावा. त्यांना रमी खेळण्यासाठी घरी बसवा, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत केली.

Ministers play rummy in the assembly while farmers are in trouble; Demand Minister Kokate's resignation, opposition falls apart | शेतकरी संकटात असताना मंत्री सभागृहात खेळतात रमी; मंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या, विरोधक पडले तुटून

शेतकरी संकटात असताना मंत्री सभागृहात खेळतात रमी; मंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या, विरोधक पडले तुटून

छत्रपती संभाजीनगर : पावसाअभावी अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आहे. शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली  असताना, राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे मात्र विधिमंडळात रमी खेळत असल्याचे दिसले. अशा असंवेदनशील कृषिमंत्र्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने राजीनामा घ्यावा. त्यांना रमी खेळण्यासाठी घरी बसवा, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत केली.

दानवे म्हणाले, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले. बोगस बियाण्यांच्या तक्रारी आहेत, अन् कृषिमंत्री कोकाटे सभागृहात रमी खेळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. असा मंत्री मंत्रिमंडळात आहे, याचा अर्थ मुख्यमंत्री फडणवीस यांची काहीतरी मजबुरी असेल, असा टोला त्यांनी लगावला.

हकालपट्टी करा : सुप्रिया सुळे
कृषिमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, नाही तर मुख्यमंत्र्यांची त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. ऑनलाइन गेमिंगमुळे कुटुंब बरबाद होत असल्याने त्याच्यावर बंदीची मागणी होत आहे. दुसरीकडे कृषिमंत्री सभागृहातच मोबाइलवर रमी खेळत आहेत, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.

मंत्री प्रताप सरनाईक यांचा अजब तर्क 
शिंदेसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावर प्रतिक्रिया देताना अजब तर्क लढवला. आमिर खान, शाहरूख खानही रमी खेळतात. टीव्हीवाल्यांना तो चांगला गेम वाटत असेल. जुगार म्हणून योग्य नाही, मनोरंजन म्हणून त्याकडे बघितले जात असेल तर योग्य आहे, असे सरनाईक म्हणाले.

शेतकऱ्यांशी काही देणेघेणे नाही 
शेतकरी मरतोय आणि कृषिमंत्री रमी खेळतात. या सरकारला शेतकऱ्यांशी काही देणेघेणे नाही, भाजपने कोकाटे यांना नावालाच मंत्री केले, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.  

भिकाऱ्यांसोबत केली होती तुलना
याच कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांसोबत केली होती. हा माणूस सभागृहात रमी खेळत असेल, तर त्यांची तुलना कुणासोबत करायची? असा प्रश्न शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी विचारला. 

ही त्यांची आठवी ते नववी चूक 
कृषिमंत्र्यांची ही आठवी ते नववी चूक असेल. यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या? शेतकऱ्यांना सांगायचे, तुम्ही दारू पिता, लग्नात खर्च होतो, म्हणून कर्ज होत आहे आणि कृषिमंत्रीच रमी खेळतो, असे शेतकरी नेते बच्चू कडू म्हणाले.  

हे योग्य नाही
हा शिष्टाचाराचा, संकेतांचा भाग आहे. विधानसभेची जागा पवित्र आहे. हे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

Web Title: Ministers play rummy in the assembly while farmers are in trouble; Demand Minister Kokate's resignation, opposition falls apart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.