प्रकाश आंबेडकर यांच्या पराभवाचे एमआयएमला दु:ख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 23:05 IST2019-05-27T23:04:02+5:302019-05-27T23:05:36+5:30
बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना लोकसभा निवडणुकीत अकोला आणि सोलापूर मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागला.

प्रकाश आंबेडकर यांच्या पराभवाचे एमआयएमला दु:ख
औरंगाबाद : बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना लोकसभा निवडणुकीत अकोला आणि सोलापूर मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागला. एमआयएमला त्यांच्या पराभवाचे दु:ख असल्याचे मत खा. इम्तियाज जलील यांनी आज एका पत्रकार परिषदेत व्यक्त केले. येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये एमआयएम- बहुजन वंचित आघाडी चमत्कार करणार असल्याचा दावाही त्यांनी केला.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मुस्लिम-दलित बांधवांनी शंभर टक्के साथ दिल्याने एमआयएमला विजय मिळविता आला. सोलापूर, अकोला लोकसभा मतदारसंघात मुस्लिम बांधवांनी प्रकाश आंबेडकर यांना मतदान केले नाही, या थेट प्रश्नावर इम्तियाज जलील यांनी नमूद केले की, आम्हाला सर्वाधिक दु:ख त्यांच्या पराभवाचे आहे. काही जागांवर आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी अजिबात मिळाला नाही. याची नेमकी कारणे काय याचा शोध घेण्यात येत आहे. सोलापूर येथे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मुंबईहून काही मुस्लिम धर्मगुरूआणले होते. त्यांचा सोयीस्कर वापर त्यांनी केल्याचा आरोप जलील यांनी केला. प्रकाश आंबेडकर यांच्या विजयासाठी मी स्वत: आणि खा. असदोद्दीन ओवेसी यांनीही बरेच प्रयत्न केले. मुस्लिमांनी मतदान का केले नाही, यावर उत्तर देण्याचे त्यांनी टाळले.
काँग्रेस-राष्ट्रवादीपासून कंटाळलेल्या मतदारांना आता राज्यात तिसरा पर्याय मिळाला आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये मोठा चमत्कार पाहायला मिळेल, असा दावा त्यांनी केला. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मागील २० वर्षांमध्ये कोणताच विकास झालेला नाही. या मतदारसंघात काम करण्याची बरीच संधी आहे. शहरातील नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची आहे. दळणवळण, रस्ते, पाणी या पायाभूत सुविधांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचे जलील यांनी सांगितले.