एमजीएमचा पेट्रोल पंप स्थलांतरित करा
By Admin | Updated: November 29, 2014 00:30 IST2014-11-29T00:05:37+5:302014-11-29T00:30:29+5:30
औरंगाबाद : स्टेडियम आणि क्लब या सामाजिक उपक्रमासाठी सिडकोकडून घेतलेल्या जागेवर एमजीएमने पेट्रोल पंप उभारून त्याचा व्यावसायिक वापर सुरू केला.

एमजीएमचा पेट्रोल पंप स्थलांतरित करा
औरंगाबाद : स्टेडियम आणि क्लब या सामाजिक उपक्रमासाठी सिडकोकडून घेतलेल्या जागेवर एमजीएमने पेट्रोल पंप उभारून त्याचा व्यावसायिक वापर सुरू केला. सामाजिक उपक्रमासाठी राखीव असलेल्या जागेचा व्यावसायिक वापर नको, असे नमूद करीत एमजीएममध्ये उभारलेला पेट्रोल पंप अन्य ठिकाणी स्थलांतरित करा, असा आदेश खंडपीठाचे न्यायमूर्ती बी.पी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती ए.एम. बदर यांनी इंडियन आॅईल कॉर्पोरेशन कंपनीला दिला.
इंडियन आॅईल कॉर्पोरेशनने सिडकोत पेट्रोल पंप वाटप करण्यासाठी अर्ज मागविले होते. एमजीएम संस्थेने जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे इंडियन आॅईल कॉर्पोरेशनकडे पेट्रोल पंपासाठी अर्ज केला. त्यांचा अर्ज मंजूर करून २०१३ मध्ये इंडियन आॅईल कॉर्पोरेशनने पेट्रोल पंप उभारला.
सामाजिक उपक्रमासाठी वापर करण्याच्या अटीवर घेतलेल्या जागेचा व्यावसायिक वापर करण्यास सिडकोने आक्षेप घेतला. एमजीएमला नोटीस पाठवून जागेचा व्यावसाायिक वापर बंद करण्यास सांगितले. तेव्हा शासन अध्यादेशानुसार मिळालेल्या एकूण जागेपैकी १५ टक्के जागेचा व्यावसायिक वापर करता येतो, असे सांगून एमजीएमने नोटीस मागे घेण्याची विनंती सिडकोला केली. मात्र, सिडकोने या उत्तराची दखल न घेता पेट्रोल पंपाला सील लावले. त्या विरोधात इंडियन आॅईल कॉर्पोरेशनने खंडपीठात याचिका दाखल केली. ती सुनावणीसाठी आली असता न्यायालयाने ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचा आदेश दिला होता.
जनहित याचिका निकाली
दरम्यान, ही याचिका पुन्हा न्यायालयासमोर आली असता सिडकोतर्फे अॅड. अनिल बजाज यांनी सांगितले की, एमजीएमने ज्या ठिकाणी पेट्रोल पंप उभारला, ती जागा स्टेडियम आणि क्लबसाठी दिलेली आहे.
तसेच २००२ मध्ये एका जनहित याचिकेत एमजीएमने त्यांच्याकडील जागेचा वापर सामाजिक उपक्रमासाठीच करणार असल्याचे नमूद केले होते.