वडगावकरांना एमआयडीसीचा शुद्ध पाणीपुरवठा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 01:02 IST2017-08-17T01:02:10+5:302017-08-17T01:02:10+5:30
: वडगाव कोल्हाटी येथील नागरिकांची दूषित पाण्यापासून सुटका झाली असून, आता गावात एमआयडीसीचा शुद्ध पाणीपुरवठा होणार आहे.

वडगावकरांना एमआयडीसीचा शुद्ध पाणीपुरवठा सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
वाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी येथील नागरिकांची दूषित पाण्यापासून सुटका झाली असून, आता गावात एमआयडीसीचा शुद्ध पाणीपुरवठा होणार आहे. त्यासाठी दीड कोटी रुपये खर्च करून नवीन जलवाहिनी टाकण्यात आली असून, या उपक्रमाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला.
या पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ खा. चंद्रकांत खैरे, आ. संजय सिरसाठ, सरपंच महेश भोंडवे, उपसरपंच हौसाबाई पाटोळे, सेनेचे उपजिल्हाप्रमुख नंदकुमार घोडेले, हनुमान भोंडवे आदींच्या उपस्थितीत करण्यात आला.
पंचायत समिती सदस्य राजेश साळे, सतीश पाटील, लक्ष्मण लांडे, माजी उपसरपंच सुनील काळे आदींची उपस्थिती होती. नवीन जलवाहिनीद्वारे दररोज ३ लाख लिटर पाणी गावाला मिळणार असून, येथील जलकुंभात साठवून टप्प्याटप्प्याने गावात पाणीपुरवठा केला जाणार आहे. ज्या भागात जलवाहिनी टाकण्यात आलेली नाही, अशा भागातही लवकर जलवाहिनी टाकून पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी गणेश धनवई यांनी सांगितले. श्रीकृष्ण भोळे यांनी सूत्रसंचालन तर सुनील काळे यांनी आभार मानले.
येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून गाजत असून, नागरिकांना बाराही महिने पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. गावातील पाणीप्रश्न निकाली काढण्यासाठी सरपंच महेश भोंडवे, उपसरपंच हौसाबाई पाटोळे व ग्रामपंचायत पदाधिकाºयांनी एमआयडीसी प्रशासनाकडे सतत पाठपुरावा केला. एमआयडीसीने पाणीपुरवठा करण्यास सहमती दर्शविल्यानंतर ग्रामपंचायतीने चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून १ कोटी ४३ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्यातून गतवर्षी ५ किलोमीटरची जलवाहिनी टाकण्यात आली. मात्र, या योजनेचे काम कासवगतीने होत असल्याचा आरोप करून योगेश साळे, प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी २४ मार्चला उपोषण सुरू केले होते.