"मद्यप्रेमींची चिंता वाढणार!"; युद्धामुळे मद्याच्या कॅन-बाटल्यांचा साठा फक्त १५ दिवसांचा
By सुमित डोळे | Updated: March 13, 2026 19:44 IST2026-03-13T19:41:44+5:302026-03-13T19:44:52+5:30
युद्धाच्या झळा एमआयडीसीला! मद्य कंपन्यांचे कोट्यवधींचे नुकसान; रिकाम्या बाटल्या आणि कॅनसाठी गॅस मिळेना

"मद्यप्रेमींची चिंता वाढणार!"; युद्धामुळे मद्याच्या कॅन-बाटल्यांचा साठा फक्त १५ दिवसांचा
छत्रपती संभाजीनगर : इराण, इस्त्रायल येथे भडकलेल्या युद्धाचा परिणाम आता जिल्ह्यातील मद्यनिर्मितीवर होण्याची दाट शक्यता आहे. मद्यासाठी लागणाऱ्या कॅन, बाटल्यांचा साठा केवळ पंधराच दिवसांचा उरला असून, जिल्ह्यावर २०० कोटींपेक्षा अधिक नुकसानीचे दाट सावट पसरले आहे. युद्ध थांबल्यानंतरही परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी किमान दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागेल. त्यामुळे याचा जिल्ह्यातील मद्यनिर्मितीवर गंभीर परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
जिल्ह्यातील मद्यनिर्मितीतून राज्याला हजारो कोटींचा महसूल प्राप्त होतो. जगभरात प्रसिद्ध असलेल्या अनेक नामांकित व्हिस्की तसेच बियर कंपन्यांचे उत्पादन वाळूज व चिकलठाणा औद्योगिक वसाहतींमध्ये होते. मध्यपूर्व देशांमध्ये एबीडी, रॅडिको कंपनीच्या साधारण ५० कंटेनरद्वारे मद्यपुरवठा होतो. युद्धामुळे मात्र, यापैकी जवळपास ४० कंटेनरचा पुरवठा थांबवण्याबाबत कंपन्यांना सांगण्यात आले आहे. यापैकी आधीच जेएनपीटी बंदरावर पोहोचलेले पाच ते सहा कंटेनर तेथेच अडकून पडले आहेत. १७ फेब्रुवारी रोजी निघालेले दोन कंटेनर मात्र सुरक्षितरीत्या पोहोचल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
कशी होती निर्मिती
जिल्ह्यात ६ व्हिस्की तर ६ बियर उत्पादन करणाऱ्या कंपन्या आहेत. २०२५ अखेर जिल्ह्यातून जवळपास ४८३२.८३ कोटींचे मद्य उत्पादन झाले होते. यात विदेशी दारूचे सुमारे १.२६ कोटी लीटर तर बियरचे सुमारे १.४० कोटी लीटर उत्पादनाची नोंद झाली होती.
गॅस शॉर्टेजचा कॅन, बॉटल निर्मितीवर परिणाम
-मद्यनिर्मितीमध्ये काचेच्या बाटल्या व ॲल्युमिनियम कॅन निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गॅसचा वापर होतो. प्रत्येक कंपन्यांचा आकार हा वेगळा असतो. हा आकार देण्यासाठी जो हायफ्लेम गॅस लागतो, त्याचा तुटवडा झाल्यास मद्यनिर्मिती ठप्प होण्याची शक्यता आहे.
-गॅसच्या तुटवड्याचा थेट परिणाम या बॉटल, कॅन निर्मितीवर होणार.
-सद्य:स्थितीत जिल्ह्यातील मद्य कंपन्यांकडे १५ दिवसांचा साठा आहे.
-१५ दिवसांनंतर जवळपास प्रती महिना २०० कोटींच्या आसपास नुकसान सुरू होईल.
-पंधरा दिवसांत अंदाजे दीड लाख केसेसची निर्मिती होऊ शकते. १ केसमध्ये २४ कॅन तर बारा बॉटल असतात.