एनएसयुआयच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडणुकीत गोंधळ; मतदारांवर दबाव टाकण्याचा झाला प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 16:20 IST2018-05-03T16:11:17+5:302018-05-03T16:20:52+5:30
मतदानाच्या दुसऱ्या टप्यात आज शहरातील मतदान केंद्रावर काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत मतदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.

एनएसयुआयच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडणुकीत गोंधळ; मतदारांवर दबाव टाकण्याचा झाला प्रयत्न
औरंगाबाद : एनएसयुआय अर्थात अखिल भारतीय विद्यार्थी कॉंग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदासाठी सध्या निवडणूक सुरु आहे. आज मतदानाच्या दुसऱ्या टप्यात शहरातील मतदान केंद्रावर काही जणांनी गोंधळ घालत मतदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
कॉंग्रेसची विद्यार्थी शाखा असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी कॉंग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदासाठी सध्या निवडणुका सुरु आहेत. यासाठी औरंगाबादमधून जिल्हाध्यक्ष सागर साळुंखे हे उमेदवार आहेत. आज मतदानाचा दुसरा टप्पा सुरु आहे, दुपारी मतदान केंद्रावर शांततेत मतदान सुरु असताना अचानक काही जणांनी मतदानासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना मारहाण करत हुसकावून लावले. काही वेळाने पोलिसांनी यात हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, या सगळ्या गोंधळात काही विद्यार्थ्यांनी मतदान न करताच तेथून काढता पाय घेतला.
गोंधळा मागे पुण्यातील उमेदवार
विश्वजित कदम यांचा पुण्यातील एक कार्यकर्तासुद्धा या पदासाठी उभा आहे. या विभागात आमचे पारडे जड आहे यामुळे कदम यांच्या पुण्यातील कार्यकर्त्याच्या सांगण्यावरून हा सर्व प्रकार झाला. त्यांनी मतदारांना हुसकावून लावण्यासाठी गुंडांचा वापर केला, असा आरोप साळुंखे यांनी केला. तसेच याप्रकरणाची सविस्तर तक्रार कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना मेल द्वारे करण्यात आल्याची माहितीसुद्धा त्यांनी दिली.