व्यापाऱ्यावर हल्ला
By Admin | Updated: December 29, 2014 00:57 IST2014-12-29T00:50:02+5:302014-12-29T00:57:20+5:30
देवणी : गुटखा विक्रीची माहिती पोलिसांना सांगितल्याचा राग मनात धरुन देवणीतील चार व्यापाऱ्यांनी एका व्यापाऱ्यावर रविवारी दुपारी प्राणघातक हल्ला करुन

व्यापाऱ्यावर हल्ला
देवणी : गुटखा विक्रीची माहिती पोलिसांना सांगितल्याचा राग मनात धरुन देवणीतील चार व्यापाऱ्यांनी एका व्यापाऱ्यावर रविवारी दुपारी प्राणघातक हल्ला करुन दुचाकी जाळल्याची घटना घडली आहे़ या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे़ कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणात गुटख्याची आवक लातूर जिल्ह्यात सुरू आहे. मात्र याकडे संबंधित यंत्रणेने पुरते दुर्लक्ष केल्यामुळेच गुटखा विक्री तेजीत आहे.
देवणी येथील व्यापारी सतीश काशीनाथ डोंगरे हे रविवारी दुपारी १ च्या सुमारास बसस्थानकाकडून घराकडे दुचाकी (एमएच २४, एई- ३१६८) वरुन निघाले होते़ ते शहरातील मराठवाडा ग्रामीण बँकेजवळ पोहोचले असताना गावातील व्यापारी ओम मिटकरी, गजानन मिटकरी, प्रकाश मिटकरी, नागेश मिटकरी या चौघांनी त्यांना रस्त्यात अडविले़ या चौघा व्यापाऱ्यांनी ‘तू आमच्या गुटखा विक्रीची माहिती पोलिसांना का देतोस,’ असे म्हणत सतीश डोंगरे यांना लाथा- बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली़ अचानक सुरु झालेल्या मारहाणीमुळे डोंगरे हे जीव वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांच्या पोटाच्या दोन्ही बाजूस तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आला़ त्यामुळे ते गंभीर जखमी झाले़ पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याची धमकीही त्यांनी डोंगरे यांना दिली़
दरम्यान, डोंगरे यांची दुचाकी ताब्यात घेऊन या चौघांनी बोरोळ रस्त्यावर नेऊन ती जाळली़ याप्रकरणी सतीश डोंगरे यांच्या फिर्यादीवरुन देवणी पोलीस ठाण्यात ओम मिटकरी, गजानन मिटकरी, प्रकाश मिटकरी, नागेश मिटकरी या चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलिसांनी घटनास्थळास भेट देण्याबरोबरच जाळण्यात आलेली दुचाकीही जप्त केली आहे़ अधिक तपास पोहेकॉ आय़ एच़ बागवान करीत आहेत़
शासनाने नुसतीच गुटखा बंदी केली आहे. राजरोसपणे सर्वत्र गुटखा विक्री केला जात आहे. ग्राहकांना चढ्या दराने विक्री होत असल्याने शासकीय यंत्रणेतील काही विशिष्ट विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमाईही यातून वाढली आहे. (वार्ताहर)४
गुटखा विक्री करण्यात येत असल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी या घटनेतील आरोपींच्या घरावर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी धाड टाकून मोठा साठा जप्त केला होता़ त्यावर कार्यवाहीही झाली होती़ कर्नाटक राज्यातून गुटखा आणून विक्री या भागात होत आहे़