जनतेचे कोणतेही काम सांगा पण कोणाच्या बदलीचे काही बोलू नका; योगेश कदम यांचे आवाहन
By बापू सोळुंके | Updated: February 14, 2025 18:21 IST2025-02-14T18:20:24+5:302025-02-14T18:21:06+5:30
कोणतीही कामे आमदार, जिल्हाप्रमुखांमार्फत घेऊन या पण बदलीचे काम सांगू नका

जनतेचे कोणतेही काम सांगा पण कोणाच्या बदलीचे काही बोलू नका; योगेश कदम यांचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर: माझ्याकडे गृहराज्यमंत्री, ग्रामविकास, महसूल आणि अन्न व नागरी पुरवठा अशी महत्वाची चार महत्वाची खाती आहेत. या खात्याशी संबंधित जनतेची कामे करा आणि पक्षसंघटन मजबूत करा. जनतेची कोणतेही काम सांगा, पण अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदलीचे काम आणू नका, असे आवाहन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले.
शिंदेसेनेच्या जिल्ह्यातील आमदार आणि पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक मंत्री कदम यांनी सुभेदारी विश्रामगृह येथे आयोजित केली होती. यावेळी मंचावर आमदार प्रदीप जैस्वाल,आ.रमेश बोरनारे, आ.संजना जाधव, शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी जि.प.अध्यक्षा लता पगारे, शिल्पाराणी वाडकर यांची उपस्थिती होती. यावेळी मंत्री कदम म्हणाले की, पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी आपल्याला मंत्रीपदाची संधी दिली. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या शिस्तिप्रमाणे आपल्या पक्षात मंत्रीपदापेक्षा पक्षाचा नेता मोठा असतो. आमदारापेक्षा जिल्हाप्रमुख, तर सरपंचापेक्षा शाखाप्रमुख हे मोठे पद मानल्या जाते. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिकेच्या निवडणुकीच्यासाठी संघटन मजबूत करण्यावर सर्वांनी भर द्यावा. आपल्याकडे असलेल्या चार विभागाच्या राज्य मंत्रीपदाचा पदभार आहे. कोकणात ज्याप्रमाणे महसूल कॅम्प आयोजित करुन सामान्य नागरीकांना विविध दाखले दिले होते. तशा प्रकारचा कॅम्प येथेही आयोजित करण्याच्या सूचना त्यांनी आमदारांना दिल्या. शिवाय गरीबांना अंत्योदय योजनेतून मोफत धान्य मिळवून द्या, अशी अनेक कामे करुन संघटन मजबूत करा. कोणतीही कामे आमदार, जिल्हाप्रमुखांमार्फत घेऊन या पण बदलीचे काम सांगू नका, असे आवाहनच त्यांनी पदाधिकाऱ्यांना केले. यावेळी आ. बोरनारे, आ. जैस्वाल आणि आ. जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. जिल्हाप्रमुख जंजाळ यांनी प्रास्तविक केले तर माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी सूत्रसंचलन केले.
एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करा
पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदी कार्यरत असताना केलेले गतीमान काम राज्याने पाहिले आहे. यामुळे ते पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजे हे पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्याला जसे वाटते तसे आपल्याही वाटत असल्याचे कदम यांनी सांगितले. असे असले तरी महायुती म्हणून आपण एकत्रित काम करणे गरजचे असल्याचे त्यांनी नमूद केले.