‘महफिल-ए-विदा’ने उरुसाचा समारोप
By Admin | Updated: September 10, 2014 00:51 IST2014-09-10T00:39:57+5:302014-09-10T00:51:01+5:30
औरंगाबाद : शहागंज येथील प्रसिद्ध सूफी संत हजरत निजामोद्दीन औलिया यांच्या वार्षिक उरुसानिमित्त मागील चार दिवसांपासून भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

‘महफिल-ए-विदा’ने उरुसाचा समारोप
औरंगाबाद : शहागंज येथील प्रसिद्ध सूफी संत हजरत निजामोद्दीन औलिया यांच्या वार्षिक उरुसानिमित्त मागील चार दिवसांपासून भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी ‘महफिल- ए- विदा’ने उरुसाचा समारोप करण्यात आला. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंगळवारी दुपारी २ वाजेपासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत दर्ग्यामध्ये महिलांना दर्शनासाठी संधी देण्यात आली होती. यावेळी मोठ्या संख्येने महिला भाविकांनी गर्दी केली होती. त्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आला.
शनिवारी सायंकाळी खडकेश्वर येथून संदल मिरवणूक काढण्यात आली होती. दर्गा शाह शरीफ साहब येथेही ‘महफील- ए- समां’चे आयोजन करण्यात आले होते. संदल मिरवणूक झाल्यावर हजरत सय्यद निजामोद्दीन औलिया दर्ग्यामध्येही ‘महफील- ए- मिलाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
रविवारी पहाटे ३ वाजता ‘महफील- ए- समां’ या कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर ‘संदल माली’, ‘चिराग- ए- गुल’, ‘फातेहा’ आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. भाविक मोठ्या श्रद्धेने या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते. सकाळी ‘फज्र’च्या नमाजनंतर पवित्र ‘कुराण’ पठण कार्यक्रम घेण्यात आला. रात्री ९.३० वाजता दर्गा परिसरात कव्वालीचा कार्यक्रम सुरू झाला. यावेळी जयपूरचे टिम्मू गुलफाम आणि हैदराबाद येथील तहसीन हुसैन यांनी एकापेक्षा एक सरस कव्वाली सादर करून उपस्थितांची दाद मिळविली. सोमवारी सायंकाळीही कव्वालीचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानंतर ७ वाजता ‘चिरांगा’ कार्यक्रमासह विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. सज्जादा नशीन सय्यद मोईनोद्दीन ऊर्फ मोहंमदमियाँ फकरी, प्रबंधक सय्यदा नैयरजहाँ बेगम, अॅड. महबूबमियाँ निजामी आदींनी आभार मानले.