महाराष्ट्रात लवकरच येणार ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’ योजना, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 06:16 IST2025-12-08T06:16:04+5:302025-12-08T06:16:45+5:30
छत्रपती संभाजीनगरात रविवारी प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आरोग्य विभागाची आढावा बैठक झाली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

महाराष्ट्रात लवकरच येणार ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’ योजना, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
छत्रपती संभाजीनगर : राज्यात मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिकसह विविध ठिकाणी मोठ-मोठी सरकारी आणि खासगी रुग्णालये आहेत. तामिळनाडूच्या धर्तीवर महाराष्ट्रात लवकरच ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’ योजना आणत आहोत. लवकरच त्याला कॅबिनेटची मान्यता मिळेल. तमिळनाडूपेक्षा अधिक चांगले काम राज्यात होईल आणि एक नवीन इंडस्ट्री तयार होईल, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले.
छत्रपती संभाजीनगरात रविवारी प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आरोग्य विभागाची आढावा बैठक झाली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’ योजनेचा शासन निर्णय लवकरच येईल. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना, ‘ईएसआयसी’ प्रमाणे रुग्णालयांना सोबत घेऊन या योजनेत काम केले जाईल. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत पूर्वी दीड हजार कोटी रुपये खर्च होत असे. आता ५ हजार ते साडेपाच हजार कोटी खर्च हाेतात, असे आबिटकर यांनी सांगितले.
मध्यरात्री अधिकाऱ्यांची कानउघडणी
मंत्री आबिटकर हे शनिवारी मध्यरात्री शहरात दाखल झाले. रात्री १ वाजता त्यांनी थेट जिल्हा रुग्णालय गाठले. रुग्णांच्या खाटेवरील बेडशिट बदलण्याकडे दुर्लक्ष, बंद किमाेथेरपी सेंटरसह अनेक मुद्द्यांवरून त्यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.
पाच खाटांपर्यंत मान्यता
खाटांपर्यंतच्या ‘डे केअर सेंटर’च्या रुग्णालयांना मान्यता देण्याची डाॅक्टरांकडून मागणी आहे. त्याला मान्यता दिली जात आहे.
जिल्हा रुग्णालयांमध्ये अवयवदान होण्याच्या दृष्टीने रोटो-सोटो कमिटी (क्षेत्रीय तसेच राज्य अवयव आणि ऊतक प्रत्यारोपण संघटना) विकसित करत आहोत.
राज्यस्तरावर त्याचा ‘डॅश बोर्ड’ केला जाईल. हिमोफिला रुग्णांसाठी महत्वपूर्ण असलेले ‘हेमलिब्रा’ हे औषध लवकरच उपलब्ध होईल. या औषधीच्या खरेदीसाठी ४ कोटी रुपयांची ऑर्डर देण्यात आल्याचेही आबिटकर यांनी सांगितले.
परदेशी रूग्णांसाठी ‘व्हॅल्यू टुरिझम’ योजना
या योजनेत परदेशातील रुग्णांना महाराष्ट्रात उपचार, शस्त्रक्रिया व इतर वैद्यकीय सुविधा वाजवी दरात उपलब्ध करून देण्यात येतील. त्यामुळे मेडिकल टुरिझमला चालना मिळेल.
त्या अनुषंगाने विविध देशांशी, तेथील रुग्णालयांशी करार केले जातील. उपचारार्थ येणाऱ्यांसाठी व्हिसा प्रक्रिया योजनेंतर्गतच दिली जाईल.
बालकांचा बळी, ४ बिबट्यांना जन्मठेप
नाशिक : वडनेर दुमाला शिवारात बालकांवर हल्ला करणारे दोन आणि सिन्नर वनपरिक्षेत्रातील दोन अशा चार बिबट्यांना आयुष्यभरासाठी कैदेत ठेवले जाणार आहे. याबाबत वनविभागाचा निर्णय झाला आहे. मात्र, अन्य बिबट्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्याबाबत नागपूरच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयांतर्गत समितीकडून नाशिक वनविभागाला आदेश प्राप्त झालेले नाहीत.