खाजगी अभियंत्यांकडून ‘एमबी रेकॉर्ड’!
By Admin | Updated: November 7, 2014 00:42 IST2014-11-07T00:21:22+5:302014-11-07T00:42:57+5:30
बीड : जिल्हा परिषदेंतर्गत बांधकाम विभागामार्फत झालेल्या कामांची मोजमाप पुस्तिका खाजगी अभियंत्यांकडून रेकॉर्ड केल्याची माहिती पुढे आली आहे़

खाजगी अभियंत्यांकडून ‘एमबी रेकॉर्ड’!
बीड : जिल्हा परिषदेंतर्गत बांधकाम विभागामार्फत झालेल्या कामांची मोजमाप पुस्तिका खाजगी अभियंत्यांकडून रेकॉर्ड केल्याची माहिती पुढे आली आहे़ कारवाईच्या भीतीने जि़ प़ मधील अभियंत्यांनी नकार दिल्यामुळे काही गुत्तेदारांनी खाजगी अभियंत्यांचा आधार घेतला़ या माध्यमातून कोट्यावधी रूपयांच्या कामांची देयकेही अदा करण्यात आली आहेत़
२०१४-१५ या वर्षामध्ये बांधकाम वर्ग १, २ विभागांसाठी प्रत्येकी ५० लाख रूपये इतक्या निधीची तरतूद मूळ अंदाजपत्रकात करण्यात आली होती़ मात्र जिल्हा परिषदेच्या स्वत:च्या उत्पन्नातून तरतुदीपेक्षा कितीतरी पटीने अधिक कामे करण्यात आली होती़ नेमकी कामे किती रूपयांची झाली ? किती कामांना प्रशासकीय मंजुरी आहे ? किती कामांची देयके अदा करण्यात आली आहेत ? या संदर्भातील कुठलीच माहिती बांधकाम विभाग तसेच वित्त व लेखा विभागामध्ये उपलब्ध नाही़ त्यामुळे चौकशीचा ससेमिरा सुरू आहे़
दरम्यान, प्रशासकीय मान्यता नसतानाही जिल्हा परिषदेत बनावट कार्यारंभ आदेशाच्या संचिकाद्वारे काहींनी कामे करून बिले उचलल्याचेही पुढे आले होते़ तत्कालिन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ अशोक कोल्हे यांनी या संदर्भातील अहवाल शासनाला पाठविला होता़ नंतर सीईओ राजीव जवळेकर यांनी नियमबाह्य कामे रद्द करण्याचे आदेश दिले होते़
काही गुत्तेदारांनी नियमबाह्य कामांसाठी शाखा अभियंत्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला़ मात्र या अभियंत्यांनी दाद न दिल्यामुळे गुत्तेदारांनी खाजगी अभियंत्यांना गाठून त्यांच्याकडून मोजमाप पुस्तिका तयार करून घेतल्या व त्या आधारेच थेट कार्यकारी अभियंत्याच्या स्वाक्षऱ्या घेऊन बील उचलले़
कार्यकारी अभियंता एस़ आऱ शेंडे यांनी भ्रमणध्वनी घेतला नाही़ त्यामुळे त्यांची बाजू कळाली नाही़ (प्रतिनिधी)