ओबीसी महिलेसाठी महापौरपद आरक्षित
By Admin | Updated: August 17, 2014 00:13 IST2014-08-17T00:13:29+5:302014-08-17T00:13:29+5:30
परभणी : परभणी महानगरपालिकेचे महापौरपद पुढील अडीच वर्षांसाठी ओबीसी महिलेसाठी राखीव झाले आहे.

ओबीसी महिलेसाठी महापौरपद आरक्षित
परभणी : परभणी महानगरपालिकेचे महापौरपद पुढील अडीच वर्षांसाठी ओबीसी महिलेसाठी राखीव झाले आहे.
मुंबई येथे शनिवारी महापौर पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात परभणी महानगरपालिकेचे महापौरपद इतर मागासवर्गीय महिलेसाठी राखीव झाले आहे. त्यामुळे ओबीसी प्रवर्गातील महिला सदस्याची महापौरपदासाठी वर्णी लागणार आहे. येथील नगरपालिकेचे रुपांतर महानगरपालिकेत झाल्यानंतर प्रताप देशमुख हे पहिले महापौर झाले. ६५ सदस्यांच्या या महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ३०, काँग्रेसचे २३, शिवसेनेचे ८, भाजपाचे २ आणि अपक्ष २ असे पक्षीय बलाबल आहे. महानगरपालिकेत काँग्रेस हा विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. पहिल्या महापौरांचा कार्यकाळ नोव्हेंबर महिन्यात संपत असून, दुसऱ्या महापौर पदी कोणाची वर्णी लागते याकडे लक्ष लागले आहे. पहिल्या महापौर पदाच्या निवडीच्या वेळी राष्ट्रवादीकडून प्रताप देशमुख आणि काँग्रेसकडून भगवानराव वाघमारे रिंगणात होते. या निवडणुकीत शिवसेना तटस्थ राहिली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपाने साथ दिली. एका अपक्षानेही राष्ट्रवादीच्या पारड्यात मत टाकले होते. त्यामुळे ३३ मते घेऊन प्रताप देशमुख हे महापौरपदी विजयी झाले होते. आगामी काळात विधानसभा निवडणुका असून, महापौर पदाला महत्त्व आले आहे. राष्ट्रवादीकडे सर्वाधिक ३० सदस्य असून, काँग्रेस हा मनपातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. त्यामुळे महापौर पदाच्या निवडणुकीत कशा पद्धतीने समिकरणे होतात, हे आगामी काळातच स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)
कोणाला मिळणार संधी...
येथील महानगरपालिकेचे महापौर इतर मागासवर्गीय प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे महापौरपदासाठी कोणाची वर्णी लागू शकते, हे आताच सांगणे कठीण आहे. असे असले तरी राष्ट्रवादीकडे इतर मागास प्रवर्गातील सहा ते सात महिला सदस्य आहेत. त्यात संगीता वडकर, सुदामती थोरात, रजिया बेगम युनूस सरवर आदींचा समावेश आहे. तर काँग्रेसमध्येही संगीता मुळे, स्वाती खताळ या महिला सदस्या ओ.बी.सी. प्रवर्गातून आहेत. त्यामुळे परभणी शहराचा दुसरा महापौर होण्याचा मान कोणाला मिळतो? हे आगामी काळातच स्पष्ट होणार आहे.