समर्थनगरात माथेफिरू तरुणाचे तरुणीसमोर अश्लील कृत्य ; प्रत्यक्षदर्शी तरुणाने लावले पिटाळून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:27 IST2020-12-17T04:27:54+5:302020-12-17T04:27:54+5:30
औरंगाबाद : नेहमीप्रमाणे सकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तरुणीसमोर ४० वर्षीय विकृताने अंगावरील कपडे काढून अश्लील कृत्य केल्याची बीभत्स ...

समर्थनगरात माथेफिरू तरुणाचे तरुणीसमोर अश्लील कृत्य ; प्रत्यक्षदर्शी तरुणाने लावले पिटाळून
औरंगाबाद : नेहमीप्रमाणे सकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तरुणीसमोर ४० वर्षीय विकृताने अंगावरील कपडे काढून अश्लील कृत्य केल्याची बीभत्स घटना रविवारी पहाटे ६ :१५ वाजेच्या सुमारास समर्थनगरात घडली. यावेळी अन्य तरुणाने दगड मारून त्याला पिटाळून लावले. घटनेमुळे घाबरलेली पीडिता मात्र पोलिसांत तक्रार देण्यासाठी आली नाही. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेने त्या माथेफिरूचा शोध सुरू केला.
समर्थनगर रस्त्यावर १८ ते २० वर्षांची तरुणी रविवारी पहाटे नेहमीप्रमाणे फिरत होती. ६:१५ वाजेच्या सुमारास ती समर्थनगर मुख्य रस्त्याकडून कॉलनीकडे जात असताना तिच्या मागून दुचाकीने आलेल्या अंदाजे ४० वर्षीय अनोळखी विकृताने तिच्यापासून सुमारे ३० फुटांवर दुचाकी उभी केली. यानंतर त्याने अचानक स्वतःची पँट काढून अश्लील चाळे करीत तिच्या दिशेने जाऊ लागला. हा प्रकार पाहून घाबरलेली तरुणी मोठ्याने ओरडली. त्याचवेळी बेगमपुऱ्यातील निवृत्त फौजदाराचे चिरंजीव अभिजीत जिरे हे जात होते. त्यांनी हा प्रकार पाहून दुचाकी थांबवली व त्या माथेफिरूवर दगड भिरकावला. यानंतर माथेफिरू पळत जाऊन दुचाकीवर बसला आणि सुसाट निघून गेला. या नंतर अभिजीतने तरुणीला धीर देत या घटनेची पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास सांगितले. बदनामीच्या भीतीपोटी युवतीने पोलिसांत तक्रार न करता घर गाठले.
----------------------------
चौकट
गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची घटनास्थळी पाहणी
गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक योगेश धोंडे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची पाहणी केली. मात्र, घटनास्थळी असलेला एक कॅमेरा झाडाच्या फांद्यामुळे झाकला गेल्याने त्यात काहीही कैद झाले नाही, तर अन्य एका कॅमेऱ्यात दुचाकीच्या हेडलाईटच्या प्रकाशामुळे नंबर प्लेट दिसली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.