अपघातात मामा-भाच्याचा मृत्यू
By Admin | Updated: April 18, 2016 00:53 IST2016-04-18T00:48:58+5:302016-04-18T00:53:34+5:30
तुळजापूर : भरधाव वेगातील कंटेनरने दुचाकीला समोरून जोराची धडक दिल्याने मामा-भाच्याचा जागीच मृत्यू झाला़ ही दुर्दैवी घटना रविवारी

अपघातात मामा-भाच्याचा मृत्यू
तुळजापूर : भरधाव वेगातील कंटेनरने दुचाकीला समोरून जोराची धडक दिल्याने मामा-भाच्याचा जागीच मृत्यू झाला़ ही दुर्दैवी घटना रविवारी सकाळी सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्गावरील सिंदफळ शिवारात घडली़ अपघातानंतर फरार होण्याच्या प्रयत्नातील कंटेनर तामवाडी शिवारात पकडण्यात आला असून, चालकाने मात्र, पोलिसांच्या हातावर तुरी देवून पळ काढला़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथील महादेव गजेंद्र लांडगे (वय-२९) व त्यांचा भाच्चा विनोद रामा हट्टेखोर (वय-१४) हे दोघे रविवारी सकाळी शेतातील जनावरांना चारा-पाणी करण्यासाठी गेले होते़ शेतातील काम झाल्यानंतर मामा-भाच्चे हे दुचाकीवरून (क्ऱएम़एच़२५- बी़७६०४) वरून गावाकडे येत होते़ त्यांची दुचाकी रवि कापसे यांच्या शेताजवळील महामार्गावरील पुलावर आली असता तुळजापूरहून सोलापूरकडे जाणाऱ्या कंटेनरने (क्ऱएच़आऱ३८-यू़७४५८) जोराची धडक दिली़ या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महादेव लांडगे व त्यांचा भाच्चा विनोद हट्टेखोर यांचा जागीच मृत्यू झाला़
घटनेची माहिती मिळताच तुळजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून मयतांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले़ शवविच्छेदनानंतर मयतांचे पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले़ अपघातात मामा-भाच्यांचा जागीच मृत्यू झाल्याने सिंदफळ गावावर शोककळा पसरली आहे़ मयत महादेव लांडगे यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा, पत्नी, आई-वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे़ या अपघात प्रकरणी अनिल लांडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कंटेनर चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या प्रकरणाचा अधिक तपास सपोनि दासरवाड हे करीत आहेत़ (वार्ताहर)