औरंगाबादमध्ये संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या साक्षीने लावला विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 18:30 IST2019-01-28T18:24:42+5:302019-01-28T18:30:38+5:30
साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू असताना उपस्थित मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी पुढाकार घेत साध्या पद्धतीने विवाह पार पडला

औरंगाबादमध्ये संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या साक्षीने लावला विवाह
औरंगाबाद : जळगाव रस्त्यावरील एका मंगलकार्यालयात साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू असताना उपस्थित मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी पुढाकार घेत, विवाहातील मान-पान, रूढी आणि अवाजवी खर्चाला फाटा देत, टी.व्ही. सेंटर चौकात छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ विवाह लावला. यावेळी वधु-वरांच्या दोन्ही बाजूंचे मोजके नातेवाईक या विवाहाला उपस्थित होते.
प्रदीप शंकरराव सिरसाट (रा. सिंधी पिंपळगाव, ता. बदनापुर, जि. जालना) आणि पूजा नवनाथ जाधव (रा. सांजुळ, ता. फु लंब्री)असे नवविवाहित दाम्पत्याचे नाव आहे. प्रदीप हा राजेंद्र पवार मित्रमंडळासोबत समाजप्रबोधनाचे काम करतो. दुष्काळ आणि सततच्या नापिकीमुळे शेतकरी हतबल झाला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखा टोकाचे पाऊल न उचलता, दुष्काळाचा सामना करावा. मुला-मुलींचे विवाहावर वारेमाप खर्च न करता सामुहिक विवाहात विवाह करावा, यासाठी तो काम करतो.
प्रदीप आणि पूजा यांचा साखरपुड्याचा कार्यक्रम त्यांच्या नातेवाईकांनी जळगाव रस्त्यावरील एका मंगलकार्यालयात आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते. मोठा विवाह केला तर दोन ते चार लाख रुपये खर्च येतो. हा खर्च टाळून आजच लग्न लावावे,असा प्रस्ताव प्रदीप आणि पूजा यांच्या आई-वडिलांसह अन्य नातेवाईकांसमोर ठेवला. त्यांनाही हा प्रस्ताव आवडला. त्यानंतर संभाजी महाराज यांच्या पुतळयाजवळच वधू-वराला उभे करून त्यांचा विवाह लावण्यात आला.
यावेळी प्रभाकर मते पाटील, राजेंद्र पवार, गणपत म्हस्के, जगन्नाथ उगले,अभिजीत देशमुख,अनिल बोरसे सुरेश वाकडे, आप्पासाहेब कुढेकर, मनोज गायके, नवनाथ जाधव, अरूण जाधव, रमेश केरे पाटील,रवींद्र काळे पाटील, वेताळ पाटील, सतीश वेताळ पाटील आदींची उपस्थिती होती.