सिटीचौक, अत्तरगल्ली, रंगारगल्लीत मार्किंग! महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाची कारवाई
By मुजीब देवणीकर | Updated: April 27, 2024 20:08 IST2024-04-27T20:08:27+5:302024-04-27T20:08:41+5:30
सिटी चौक ते रंगार गल्लीपर्यंत अतिक्रमणांची पाहणी, रस्ता रुंदीकरणासाठी मार्किंगही करण्यात आली.

सिटीचौक, अत्तरगल्ली, रंगारगल्लीत मार्किंग! महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाची कारवाई
छत्रपती संभाजीनगर : सिटी चौक, अत्तर गल्ली, रंगार गल्लीत अतिक्रमणांची संख्या बरीच वाढली आहे. मनपाच्या अतिक्रमण हटाव विभागाकडे नागरिक, व्यापाऱ्यांनी बऱ्याच तक्रारीसुद्धा केल्या. या तक्रारींची दखल घेऊन शुक्रवारी अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने पाहणी केली. नगररचना विभागाच्या नकाशानुसार मार्किंग केली. अतिक्रमण असलेल्या व्यापाऱ्यांनी सोमवारपर्यंत स्वत:हून आपले अतिक्रमण काढून घेण्याची सूचना केली.
शहराची मुख्य बाजारपेठ म्हणजे सिटी चौक ते पैठण गेट होय. या भागात चारचाकी वाहनधारकाला सहजपणे दिवसा ये-जा करता येत नाही. दुचाकी वाहनधारकांनाही अतिक्रमणांचा बराच त्रास सहन करावा लागतो. सकाळी १० ते रात्री ११ पर्यंत या भागात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. शहराच्या वेगवेगळ्या भागांत राहणाऱ्या महिला या ठिकाणी खरेदीसाठी मोठ्या संख्येने येतात. १४ एप्रिलपूर्वी मनपाने गुलमंडी भागात अतिक्रमणांवर कारवाई केली होती. त्यानंतरही फेरीवाले, रस्त्यावर बसून विविध साहित्य, फळ, भाजीपाला विकणाऱ्यांचा त्रास कमी झालेला नाही. सिटी चौक ते रंगार गल्लीपर्यंत अतिक्रमणे होत असल्याच्या तक्रारी वारंवार प्राप्त हाेऊ लागल्या.
शुक्रवारी अतिरिक्त आयुक्त वाहुळे यांनी अतिक्रमण हटाव विभागाच्या पथकासोबत या भागात पाहणी केली. जुन्या शहर विकास आराखड्यानुसार रस्त्यांची रुंदी जेवढी दर्शविण्यात आली, त्यानुसार मार्किंग करण्यात आली. ‘लोकमत’शी बोलताना वाहुळे यांनी सांगितले की, व्यापाऱ्यांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेतले पाहिजे. सोमवारी मनपा साहित्य जप्त करेल. हे साहित्य परत मिळणार नाही. आजच्या पाहणीत तीन व्यापाऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड आकारण्यात आला. ज्या मालमत्ताधारकांनी न्यायालयात प्रकरण असल्याचे नमूद केले, त्यांना कागदपत्रांसह मनपात बोलावल्याचे त्यांनी नमूद केले.