मरसांगवीला ‘माळीण’ची भिती
By Admin | Updated: September 11, 2014 01:07 IST2014-09-11T00:43:27+5:302014-09-11T01:07:51+5:30
एम़ जी़ मोमीन , जळकोट जळकोट तालुक्यातील मरसांगवी साधारणत: अडीचशे उंबऱ्यांचे गाव़़़ जवळपास शंभरएक वर्षापूर्वीपासून याठिकाणी वस्ती झालेली़

मरसांगवीला ‘माळीण’ची भिती
एम़ जी़ मोमीन , जळकोट
जळकोट तालुक्यातील मरसांगवी साधारणत: अडीचशे उंबऱ्यांचे गाव़़़ जवळपास शंभरएक वर्षापूर्वीपासून याठिकाणी वस्ती झालेली़़़ डोंगराच्या पायथ्याशी आता चांगलीच पक्की घरे वसली आहेत़ परंतु, आता येथील गावकऱ्यांना ‘माळीण’ दुर्घटनेने जबर धास्ती बसली आहे़ डोंगर खचून मरसांगवीचे माळीण होईल, या भीतीने ग्रामस्थ ग्रासले आहेत़
जळकोटपासून १५ किलोमीटर अंतरावर मरसांगवी या गावाच्या वसाहतीला शंभर वर्षापूर्वी सुरुवात झाल्याचे ग्रामस्थ सांगतात़ हळुहळु लोकसंख्या वाढली तशी घरांची संख्याही वाढली़ आज हे गाव अडीचशे उंबऱ्यांचे बनले आहे़ लोकसंख्याही २२४९ इतकी झाली आहे़ पूर्वी शेजारच्याच डोंगरमाथ्यावर वस्ती वसलेली होती़ परंतु, पाण्याची अडचण होऊ लागल्याने हळुहळु वस्ती डोंगराच्या पायथ्याशी उतरली़ तिरु व परठोळ नद्यांच्या संगमावर कालांतराने वस्ती वाढत गेली़
मात्र आजतागायत या गावाला कोणत्याही नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागले नसल्याने सर्व काही सुखनैव सुरु होते़ मात्र गेल्या महिन्यात पुणे जिल्ह्यातील माळीण हे गाव डोंगराच्या उदरात गडप झाल्याच्या बातम्या वाचून, पाहून मरसांगवीकरांची झोप उडाली आहे़ माळीण दुर्घटनेला महिना झाल्याच्या बातम्या पुन्हा एकदा आल्या अन् मरसांगवीकर खडबडून जागे झाले़ त्यांनी तातडीने सरपंचाशी चर्चा करुन तलाठी व ग्रामसेवकाच्या उपस्थितीत विशेष ग्रामसभा घेतली़ गावावर पाऊस धो-धो बरसल्यास दरडी कोसळून माळीण सारखी आपत्ती कोसळण्याची भिती या ग्रामसभेत ग्रामस्थांनी व्यक्त केली़
त्याअनुषंगाने गावातील घरांचे पंचनामे करुन गावाचे पुनर्वसन करावे, अशी एकमुखी मागणी करीत ठराव घेण्यात आला़ ठरावाच्या प्रती महसूल प्रशासनाकडे पाठविण्यात आल्या आहेत़ यावर प्रशासन आता काय भूमिका घेते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे़ प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे आणि ही समस्या सोडवावी, अशी मागणी होत आहे़
माळीणची दुर्घटना पाहिल्यापासून डोंगराच्या उदरात गडप झालेले गाव आजतागायत डोळ्याआड झाले नाही़ अधूनमधून येणाऱ्या बातम्यांनी ही भीती ताजी होत आहे़ पावसाला सुरुवात झाली की अजूनही ग्रामस्थांची झोप उडते आणि माळीणचे चित्र डोळ्यासमोर तरळते अशी प्रतिक्रिया सरपंच नजमा बेगम पटेल, ऐनुद्दीन पटेल, बाबु भांडे, तानाजी राठोड, राजकुमार वाघमारे, मैनुद्दीन बिराजदार, संजय वाघमारे, संग्राम देवकते या ग्रामस्थांनी व्यक्त केल्या़