मराठवाड्याला पाणीटंचाईचे चटके; मार्चमध्येच टँकरचा आकडा ४५० पार

By विकास राऊत | Published: March 13, 2024 12:34 PM2024-03-13T12:34:52+5:302024-03-13T12:36:26+5:30

मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये २६९ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

Marathwada hit by water shortage; In March itself, the number of tankers was 450 plus | मराठवाड्याला पाणीटंचाईचे चटके; मार्चमध्येच टँकरचा आकडा ४५० पार

मराठवाड्याला पाणीटंचाईचे चटके; मार्चमध्येच टँकरचा आकडा ४५० पार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात टँकरचा आकडा ४५० पार गेला आहे. विभागाला पाणीटंचाईचे चटके जाणवत असून, तहानलेल्या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या वाढू लागली आहे. मार्चअखेर ५०० पर्यंत टँकरचा आकडा जाणे शक्य आहे. 

छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर जिल्ह्यांत पाणीटंचाई जाणवत असून, परभणी, हिंगोली, नांदेड व धाराशिव हे जिल्हे अद्याप टँकरमुक्त आहेत. १५ दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड जिल्ह्यातील मिळून एकूण १९७ गावे, ५८ वाड्यांना ३१९ टँकरद्वारे पाणी केला जात होता, तर सध्या लातूरसह या जिल्ह्यातील एकूण २७६ गावे, ७८ वाड्यांना ४५० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जालना जिल्ह्यात परतूर तालुका टँकरमुक्त असून, उर्वरित तालुक्यातील एकूण १०५ गावे व ३९ वाड्यांतील ग्रामस्थांना १७८ टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा होत आहे. भोकरदन तालुक्यात ४३ टँकर सुरू आहेत, तर जालना तालुक्यात पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या ४०च्या घरात आहे, तर बीड तालुक्यातील गेवराई तालुक्यातील १ गाव ३ वाड्यांना २ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील एका गावात एका टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.

जिल्ह्यात २६९ टँकरने पाणी...
मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये २६९ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. खुलताबाद, सोयगाव हे तालुके वगळता सर्व तालुक्यांत टँकर सुरू आहेत. पैठण तालुक्यात जायकवाडी धरण असताना देखील ३५ गावे व ८ वाड्यांना सध्या ४७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील ३८ गावे व १२ वाड्यांना मिळून ४८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. फुलंब्री तालुक्यातील २० गावे व १ वाड्यांना २६, गंगापूर तालुक्यातील २० गावे व ४ वाड्यांना मिळून ५१ टँकरद्वारे तसेच वैजापूर तालुक्यातील २८ गाव व ४ वाड्यांना एकूण ३७ टँकरद्वारे, कन्नड मधील सात तहानलेल्या गावांना १३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. सिल्लोड तालुक्यातील २१ गावे व ७ वाड्यांना मिळून ४७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे, अशी जिल्ह्यांतील एकूण १६९ गावे व ३६ वाड्यांना २६९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

Web Title: Marathwada hit by water shortage; In March itself, the number of tankers was 450 plus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.