मराठवाडा बनले वैद्यकीय शिक्षणाचे हब; दरवर्षी घडत आहेत १ हजार ७५० नवे डॉक्टर
By संतोष हिरेमठ | Updated: March 10, 2025 12:51 IST2025-03-10T12:50:43+5:302025-03-10T12:51:08+5:30
प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, खासगी वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचीही स्पर्धा

मराठवाडा बनले वैद्यकीय शिक्षणाचे हब; दरवर्षी घडत आहेत १ हजार ७५० नवे डॉक्टर
छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा आता नवीन डाॅक्टर घडविणारी नगरी म्हणून उदयास येत आहे. मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आहे. त्याबरोबर खासगी वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचीही स्पर्धा सुरू झाली आहे. आजघडीला मराठवाड्यात दरवर्षी १ हजार ७५० नवीन डाॅक्टर घडत असून, आगामी काळात ही संख्या आणखी वाढेल.
मराठवाड्यात ८ शासकीय आणि ५ खासगी वैद्यकीय महाविद्यालये कार्यरत असून, एकूण १ हजार ७५० वैद्यकीय जागांवर दरवर्षी प्रवेश दिला जातो. यामध्ये शासकीय आणि खासगी मिळून छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक ४५० जागा उपलब्ध आहेत. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्येही शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या माध्यमातून दरवर्षी शेकडो विद्यार्थी डॉक्टर बनत आहेत.
वैद्यकीय शिक्षकांची संख्या वाढावी
वैद्यकीय शिक्षक आणि तज्ज्ञांच्या मते, डॉक्टरांची संख्या वाढणे हा आरोग्य क्षेत्रासाठी महत्त्वाचा टप्पा असला, तरी दर्जेदार वैद्यकीय शिक्षण देणे तितकेच गरजेचे आहे. त्यासाठी वैद्यकीय शिक्षकांची संख्या पुरेशी वाढणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने प्राधान्याने प्रयत्न करण्याची गरज आहे.
मराठवाड्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये:
जिल्हा- विद्यार्थी प्रवेश क्षमता
छत्रपती संभाजीनगर - २००
जालना-१००
परभणी-१००
हिंगोली-१००
धाराशिव-१००
नांदेड-१५०
लातूर-१५०
बीड- अंबेजोगाई-१५०
मराठवाड्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालये
छत्रपती संभाजीनगर - २ (२०० व ५० जागा)
जालना -१ (१५० जागा)
परभणी-१ (१५० जागा)
लातूर-१ (१५० जागा)
आणखी ३ खासगी महाविद्यालये वाढणार
छत्रपती संभाजीनगरात आणखी ३ खासगी वैद्यकीय महाविद्यालये सुरू होण्याची चिन्हे आहेत. ही तिन्ही महाविद्यालये मिळून ४०० जागा वाढण्याचा अंदाज असून, त्यातून मराठवाड्यात नव्याने घडणाऱ्या डाॅक्टरांची संख्या वर्षाला २ हजारांवर जाईल.
डाॅक्टरांची संख्या वाढीस मदत
मराठवाड्यात नव्याने निर्माण झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयांमुळे डाॅक्टरांची संख्या वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे. गुणवत्तापूर्ण डाॅक्टर घडण्यासाठी या महाविद्यालयांमध्ये अधिकाधिक चांगल्या सुविधा, वैद्यकीय शिक्षक उपलब्ध करून दिले पाहिजे.
- डाॅ. भारत सोनवणे, कार्यकारी अध्यक्ष, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षक संघटना
सोयीसुविधा वाढीसाठी प्रयत्नशील
मराठवाड्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत वेळोवेळी भेट देऊन तेथील सोयीसुविधांचा आढावा घेतला जात आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी आवश्यक सुविधा देण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. मराठवाड्यातील आरोग्य सुविधा वाढीसाठी प्रयत्नशील आहे.
- डाॅ. शिवाजी सुक्रे, सहसंचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय