शुभेच्छापत्रांतून ‘मराठी’ गायब

By Admin | Updated: December 31, 2014 01:07 IST2014-12-31T00:22:54+5:302014-12-31T01:07:29+5:30

प्रशांत तेलवाडकर, औरंगाबाद मराठी’ हा मराठीबाणा फक्त कवितेपुरताच मर्यादित राहिला की काय, असा प्रश्न पडला आहे.

'Marathi' disappeared through the cheats | शुभेच्छापत्रांतून ‘मराठी’ गायब

शुभेच्छापत्रांतून ‘मराठी’ गायब

प्रशांत तेलवाडकर, औरंगाबाद
‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी’ हा मराठीबाणा फक्त कवितेपुरताच मर्यादित राहिला की काय, असा प्रश्न पडला आहे. कारण, यंदा नवीन वर्षाच्या शुभेच्छापत्रांमधील ‘मराठी’च गायब झाली आहे. मराठीचे संदेशपत्र खरेदी करणारे कमी झाल्याने कंपन्यांनी उत्पादनच घटविले आहे. मराठीचा अभिमान बाळगणाऱ्यांसाठी हा मोठा धक्काच आहे.
स्वदेशी कंपनीने मराठीतील पहिले शुभेच्छापत्र १९८४-१९८५ साली बाजारात आणले. आकर्षक मुखपृष्ठ, हृदयाला जाऊन भिडणारे काव्य आणि स्नेहाचा स्पर्श यामुळे ही शुभेच्छापत्रे हातोहात विक्री होऊ लागली.
भाषेचा हा मार्केट फंडा लक्षात घेऊन बहुराष्ट्रीय कंपन्यांनी १९९७ मध्ये इंग्रजीसोबत मराठी शुभेच्छापत्रे बाजारात आणली. २०११ या सालापर्यंत इंग्रजीच्या बरोबरीने नव्हे, तर त्याहून अधिक मराठी संदेशपत्रे विक्री होत असत. मात्र, नंतर हळूहळू मराठी संदेशपत्रांच्या विक्रीला ग्रहण लागणे सुरू झाले.
मागील वर्षी कंपन्यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणाऱ्या १० ते १२ नवीन डिझाईन बाजारात आणल्या होत्या. यंदा या संदेशाच्या परंपरेने ३० व्या वर्षात पदार्पण केले आहे. मात्र, चिंतेची बाब म्हणजे, यंदा एकाही कंपनीने नवीन डिझाईन बाजारात आणले नाही.
कार्ड उत्पादक कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, इंग्रजी ग्लोबल भाषा आहे. भारतच नव्हे तर विदेशातही मुंबई व दिल्ली येथून मोठ्या प्रमाणात इंग्रजीचे कार्ड निर्यात होतात. मात्र, मराठीचे कार्ड पुणे व मराठवाड्यातच जास्त विकले जात होते.
आता त्यातही मोठी घट आल्याने नवीन डिझाईन तयार करून विक्री करणे परवडत नसल्याने नववर्षाच्या शुभेच्छा देणारे मराठीतील शुभेच्छापत्रेछापली नाहीत. यासंदर्भात औरंगाबाद कार्डस् अँड गिफ्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुहास देशपांडे यांनी सांगितले की, मागील तीन वर्षांपासून मराठी शुभेच्छापत्रांचा खप कमी झाला आहे. दुसरीकडे इंग्रजीतील संदेशांना मागणी वाढली आहे.
व्हॉटस् अ‍ॅप, मेसेजचा परिणाम शुभेच्छापत्रांवर नक्कीच झाला आहे; पण इंग्रजीच्या कार्डला आजही मागणी आहे. शहरात नवीन वर्षाचे ५० हजार कार्ड विक्री होतात. यंदा इंग्रजीतील ४० ते ४५ नवीन डिझाईन बाजारात आल्या. मात्र, मराठीतील एकही नवीन कार्ड बाजारात आले नाही.

Web Title: 'Marathi' disappeared through the cheats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.