मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पालकमंत्री संदीपान भुमरेंच्या कार्यालयाबाहेर ठिय्या

By बापू सोळुंके | Published: February 15, 2024 06:18 PM2024-02-15T18:18:48+5:302024-02-15T18:19:35+5:30

अधिसूचनेचे आता कायद्यात रुपांतर करण्यासाठी सरकारची टाळाटाळ सुरू

Marathas thiyya outside Guardian Minister Sandipan Bhemare's office to demand reservation | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पालकमंत्री संदीपान भुमरेंच्या कार्यालयाबाहेर ठिय्या

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पालकमंत्री संदीपान भुमरेंच्या कार्यालयाबाहेर ठिय्या

छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षण अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करण्यासाठी तात्काळ महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे अधिवेशन बोलवा, मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घ्यावी, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने गुरूवारी दुपारी जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या सूतगिरणी चौकातील संपर्क कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. 

आरक्षण आमच्या हक्काचं, नाही,कुणाच्या बापाचं, एक मराठा, लाख मराठा, तुमचं, आमचं नातं काय, जय जिजाऊं, जय शिवराय अशा घोषणा देत मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते गुरूवारी दुपारी १२ वाजता पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर ठिय्या देत होते. सुमारे पाऊण तास कार्यकर्त्यांनी घोषणा देत हे आंदोलन केले. यावेळी पदाधिकाऱ्यांचे निवेदन जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी स्विकारले. आंदोलक गणेश उगले पाटील म्हणाले की, मराठा समाजाला टिकणारे ओबीसी आरक्षण समाजाला मिळावे, यासाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखो लोकांनी मुंबईत मोर्चा काढला. या आंदाेलनाचा समारोप करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजाला टिकणारे आरक्षण देण्याची घोषणा केली. यासाठी त्यांनी राज्यसरकारने काढलेल्या अधीसूचना दिली होती. 

या अधिसूचनेचे आता कायद्यात रुपांतर करण्यासाठी सरकारने टाळाटाळ सुरू केल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी १० फेब्रुवारीपासून अन्न, पाणी त्यागले आहे. या उपोषणामुळे दिवसेंदिवस त्यांची प्रकृती ढासळत आहे.यामुळे त्यांच्या उपोषणाची तात्काळ दखल घेऊन शासनाने मराठा आरक्षणाचा कायदा करण्यासाठी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवणे गरजेचे आहे. असे असताना राज्यसरकारकडून अधिवेशन बोलविण्यास विलंब केला जात असल्याने समाजात नाराजी आहे. समाजाची नाराजीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आमचे ठिय्या आंदोलन असल्याचे गणेश उगले यांनी सांगितले. या आंदोलनात विजय काकडे, पंढरीनाथ गोडसे पाटील, भारत कदम पाटील, गणेश नखाते, अर्जून मुळे,कल्याण साखळे, डॉ.रंगनाथ काळे, अशोक वाघ, परमेश्वर नरवडे, रमेश पाटील, दिपाली बोरसे आणि कल्पना साखळे आदींसह कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.

Web Title: Marathas thiyya outside Guardian Minister Sandipan Bhemare's office to demand reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.