२८८ उमेदवार उभे करू, नाहीतर उमेदवार पाडू; मनोज जरांगे पाटलांचा पुन्हा नवा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 08:05 IST2024-06-21T08:04:32+5:302024-06-21T08:05:59+5:30
जरांगे-पाटील हे छत्रपती संभाजीनगरमधील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

२८८ उमेदवार उभे करू, नाहीतर उमेदवार पाडू; मनोज जरांगे पाटलांचा पुन्हा नवा इशारा
छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे. राज्य सरकारला १३ जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. या कालावधीत आरक्षण न दिल्यास विधानसभा निवडणुकीत २८८ उमेदवार उभे करू, नाहीतर आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडू, असा इशारा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिला. जरांगे-पाटील हे छत्रपती संभाजीनगरमधील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
आमचे विरोधक भुजबळ
लक्ष्मण हाके हे वडिगोद्री येथे मराठा आरक्षणाविरोधात उपोषण करीत आहेत. यासंदर्भात जरांगे म्हणाले मराठा समाजाचे विरोधक हाके नाहीत, तर मंत्री छगन भुजबळ आहेत. मी एकाही धनगर नेत्यांना बोललो नाही. त्यांना विरोधक मानले नाही. मफलर आडवी टाकून तो तिकडे बसतो व वाद लावून देतो, अशा शब्दांत त्यांनी भुजबळांवर टीका केली.