मराठा समाजाचा ओबीसीत समावेश व्हावा
By Admin | Updated: January 13, 2017 00:42 IST2017-01-13T00:41:48+5:302017-01-13T00:42:22+5:30
जालना : मराठा समाजाचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश व्हावा, अशी मागणी मराठा सेवा संघाची होती, आहे आणि यापुढेही राहणार आहे.

मराठा समाजाचा ओबीसीत समावेश व्हावा
जालना : मराठा समाजाचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश व्हावा, अशी मागणी मराठा सेवा संघाची होती, आहे आणि यापुढेही राहणार आहे. याचा पुनरुच्चार करीत आगामी काळात यादृष्टिने मराठा सेवा संघ प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी गुरुवारी सिंदखेडराजा येथे दिली.
राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ यांच्या ४१९ व्या जयंती निमित्त सिंदखेड राजा येथे शिवधर्मपीठावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राजमाता जिजाऊ जयंती गुरुवारी अपूर्व उत्साहात सिंदखेड राजा येथे साजरी करण्यात आली. सकाळी अनेक मान्यवरांनी राजवाड्यात जाऊन जिजाऊंचे दर्शन घेतले. त्यानंतर जिजाऊ सृष्टीवर दुपारी विविध कार्यक्रम पार पडले.
सायंकाळी कार्यक्रमाची सुरूवात प्रतीक्षा हर्षे हिने जिजाऊ वंदना म्हणून करण्यात आली. शिवधर्मपीठावर खा. छत्रपती संभाजी राजे, माजी आ. रेखा खेडेकर, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष कामाजी पवार, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष डॉ. छाया महाले, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, महासचिव मधुकर मेहकरे, शिवधर्म संसद सदस्य देवानंद कापसे, नेताजी गोरे, चंद्रशेखर शिखरे, विजया कोकाटे, तनपुरे, गंगाधर बनबरे, पप्पू भोयर, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष तारक, डॉ. राम मुरकूटे, डॉ. राजीव चव्हाण, गंगाधर महाराज कुरूंदकर, शिवाजीराजे पाटील, हरियाणाचे सुरजित दाभाडे, कर्नाटकवरून आलेले वैजनाथ बिरासदार उपस्थित होते.
अॅड. खेडेकर म्हणाले, की सध्या संपूर्ण जग जागतिकिकरणाकडे जात आहे. या विज्ञान युगात जातीयतेच्या भिंती तोडून टाकण्याची गरज आहे. त्याकरिता दोन पावले आपण पुढे येऊन पाटील, देशमुख, जहागिरदार, इनामदार या पदव्या सोडून आपले मूळ आडनाव लावा, असे आवाहन त्यांनी केले. आता काळ बदलला आहे. त्यनुसार आपल्यालाही बदलावे लागेल. शिवाजी महाराजांनी घोडा व तलवारीने युद्ध लढविले. आता मात्र घोडा व तलवारीने युद्ध न करता पेन, शाई व कॉम्प्युटरच्या माध्यमातून युद्ध करावे लागणार आहे. संपूर्ण राज्यभर मराठ्यांचे मोर्चे काढण्यात आले. या मोर्चाला सुरूवात जिजाऊ वंदनेने झाली. या मोर्चाचे आयोजन करण्यात मराठा सेवा संघाचा कसा सहभाग आहे, हे लिखित स्वरूपात मांडायला हवे. अन्यथा काही वर्षांनी अन्य कुणी याचे श्रेय घेईल. मराठा मोर्चात महिलांचा सहभाग अधिक होता. तो तेवढ्यापुरताच न राहता यानंतरही विविध क्षेत्रांत महिलांनी पुढाकार घ्यायला हवा, यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी केले. आगामी काळात प्रस्थापितांना लोक धडा शिकविणार असून, शेतकरी व शेतमजुरांचे राज्य येणार आहे. यापुढे मराठ्यांनी पंचसत्ता काबिज करण्यासाठी प्रयत्न करायला हवे. तसेच अॅट्रॉसिटीचा गैरवापर थांबविण्यासाठी एससी आणि एसटी समाजबांधवांनी पुढे येण्याची विनंती त्यांनी केली. मुस्लिमांना ओबीसीत आणि धनगर समाजाला एसटीमध्ये आरक्षण मिळावे, या मागणीस मराठा समाजाचा पाठिंबा असल्याचे अॅड. खेडेकर म्हणाले.
छाया महाले म्हणाल्या, की मराठा मोर्चामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. महिला प्रत्येक मोर्चात अग्रस्थानी होत्या. हे जिजाऊ ब्रिगेडचे यश आहे. वैचारिक अंगाने व सुसंस्कृतपणे महिलांनी आतापर्यत आंदोलने केली आहेत व यानंतरही आंदोलन करणार असल्याचे महाले यांनी सांगितले. विचारवंत कक्षाचे प्रमुख गंगाधर बनबरे म्हणाले, की आम्ही ज्ञानाचे शस्त्र घेवून क्रांतीची भाषा करीत आहोत. पूर्वी राजाच्या पोटी राजे जन्माला येत होते, आता नेत्यांच्या पोटी नेते जन्माला येत आहेत. आम्हाला ही परंपरा खंडीत करायची आहे. शेतकऱ्यांनी, सामान्यांची मुले संसदेत जावी याकरिता संभाजी ब्रिगेडला राजकीय पक्षात रूपांतरीत करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष कामाजी पवार यांनी प्रास्तविक केले.
सूत्रसंचालन प्रवक्ते शिवानंद भानुसे यांनी केले. जिजाऊ सृष्टीवर ४०० पेक्षा जास्त पुस्तकांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊंच्या मूर्तीसमोर दिवसभर नागरिकांनी नतमस्तक होऊन अभिवादन केले. (प्रतिनिधी)