एकाच शहरात गतिरोधकांचे अनेक प्रकार! गंभीर चूक दिसते; पण, सुधारणार तरी कोण?
By मुजीब देवणीकर | Updated: July 8, 2023 15:34 IST2023-07-08T15:30:23+5:302023-07-08T15:34:15+5:30
शहराच्या एकाही रस्त्यावर एकसारखे गतिरोधक कुठेच पाहायला मिळणार नाहीत, हे विशेष.

एकाच शहरात गतिरोधकांचे अनेक प्रकार! गंभीर चूक दिसते; पण, सुधारणार तरी कोण?
छत्रपती संभाजीनगर : शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठमोठे गतिरोधक आपल्याला पाहायला मिळतात. मात्र, हे गतिरोधक नियमानुसार उभारले आहेत का? तर अजिबात नाही. एकही गतिरोधक नियमात बसणारा नाही. कुठे अतिशय उंच तर कुठे अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. ९० टक्के गतिरोधक मनपाच्या कंत्राटदारांनी तयार केलेत. गतिरोधक तयार करताना मनपाचा एकही अधिकारी समोर उभा राहत नाही, हे विशेष. चुकीचे गतिरोधक आहेत, हे अधिकाऱ्यांना ये-जा करताना अनेकदा लक्षातही येते. मात्र, त्याची दखल अजिबात घेतली जात नाही. शहर स्मार्ट करणाऱ्या यंत्रणेने अगोदर वाहनधारकांच्या मणक्यांचा होणारा खुळखुळा तरी थांबवावा.
जालना रोड, महावीर चौक ते हर्सूल टी पॉइंट, जळगाव रोडवगळता शहरातील सर्व रस्ते महापालिकेच्या अखत्यारीत आहेत. वर्षानुवर्षे या रस्त्यांचे डांबरीकरण, सिमेंट काँक्रिटीकरण महापालिकेकडून करण्यात येते. आश्चर्याची बाब म्हणजे अनेक सिमेंट रस्त्यांवर डांबरी पद्धतीचे मोठमोठे गतिरोधक उभारण्यात आले आहेत. याचे उदाहरणच द्यायचे तर खा. इम्तियाज जलील यांच्या घरासमोरील रस्ता आणि त्यावर उंच टेकडीसारखे उभारलेले गतिरोधक, विभागीय आयुक्त यांच्या गुलशन निवासस्थानासमोरील अतिशय त्रासदायक गतिरोधक होय. शहराच्या एकाही रस्त्यावर एकसारखे गतिरोधक कुठेच पाहायला मिळणार नाहीत, हे विशेष.
नियम काय सांगतो?
शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार ३.६ मीटर म्हणजेच १२ ते १४ फूट रुंद असलेल्या या गतिरोधकाची मधली उंची फक्त ६ ते ८ इंच इतकी असावी. दोन्ही बाजूचा भाग हा अत्यंत निमुळता असायला हवा. वाहनांचा वेग मर्यादित असेल तर वाहनचालकांना या गतिरोधकामुळे कोणताही त्रास होत नाही. या निकषात शहरातील एकही गतिरोधक बसत नाही.
संपूर्ण शहरात नियमबाह्य गतिरोधक
शहरातील एकाही रस्त्यावर इंडियन रोड काँग्रेसच्या सूचनेनुसार गतिरोधक टाकलेले नाहीत. तक्रार आली तर गतिरोधक वेडेवाकडे तयार करण्यात आले आहेत. उलट त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गतिरोधक टाकण्यापूर्वी थोड्या अंतरावर ‘पुढे गतिरोधक आहे’ अशी पाटी हवी. त्यानंतर गतिरोधकाच्या समोर पांढरे पट्टे असायलाच हवेत. उंच गतिरोधकांना चार चाकी कारचा पृष्टभाग घासला जातो. वाहनधारकांना मणक्यांचा त्रास हाेतो.
- सी.एस. सोनी, निवृत्त शहर अभियंता, मनपा.