मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली; छत्रपती संभाजीनगरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू
By बापू सोळुंके | Updated: March 3, 2025 12:20 IST2025-03-03T12:18:19+5:302025-03-03T12:20:05+5:30
Manoj Jarange Patil's Health Update: छत्रपती संभाजीनगर येथील सामाजिक कार्यकर्ते आणि काही कार्यकर्ते त्यांना भेटण्यासाठी अंतरवाली सराटी येथे गेले असता त्यांच्यासमोर जरांगे पाटील यांना भोवळ आली.

मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली; छत्रपती संभाजीनगरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू
छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याची माहिती आहे. जरांगे पाटील यांना रात्रीपासूनच अस्वस्थ वाटत होते. आज सकाळी भेटण्यास आलेल्या कार्यकर्त्यांच्या समोरच त्यांना भोवळ आली. त्यामुळे काही वेळापूर्वीच त्यांना अंतरवाली सराटी येथून छत्रपती संभाजीनगर शहरातील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश वाकडे पाटील आणि काही कार्यकर्ते त्यांना भेटण्यासाठी अंतरवाली सराटी येथे गेले असता त्यांच्यासमोर जरांगे पाटील यांना भोवळ आली. यामुळे सर्वांनी जरांगे पाटील यांना वाहनाने छत्रपती संभाजीनगर मधील खाजगी रुग्णालयात सकाळी 11 वाजता दाखल केले. जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासह अन्य मागण्यासाठी अनेकदा बेमुदत उपोषण केले होते. या उपोषणाचा त्यांच्या शरीरावर परिणाम झाल्याने त्यांच्या तब्येतीत अचानक बिघाड होतो.
छत्रपती संभाजीनगरात उपचार सुरू
आज सकाळी नेहमीप्रमाणे अंतरवाली सराटी येथे त्यांना भेटण्यासाठी विविध ठिकाणचे समाज बांधव आले होते. त्यांना भेटत असतानाच जरांगे पाटील हे चक्कर येऊन पडले. त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे त्यांच्या सहकार्यांनी सांगितले.