मनोज जरांगे यांचे सर्व रिपोर्ट नॉर्मल, पण आरामाची गरज
By बापू सोळुंके | Updated: September 19, 2023 20:10 IST2023-09-19T20:09:30+5:302023-09-19T20:10:02+5:30
उपोषणामुळे त्यांना शारीरिक थकवा असल्याने आरामाची गरज

मनोज जरांगे यांचे सर्व रिपोर्ट नॉर्मल, पण आरामाची गरज
छत्रपती संभाजीनगर : उल्कानगरी येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेले मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांची रक्त तपासणी, एक्स-रे आणि सोनोग्राफी तपासणी करण्यात आली. या सर्व तपासण्यांचे अहवाल नॉर्मल असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. मात्र उपोषणामुळे त्यांना शारीरिक थकवा असल्याने आरामाची गरज असल्याचे ते म्हणाले.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांची प्रकृती उपोषणामुळे खालावल्याचे पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेऊन १५ सप्टेंबर रोजी उपोषण सोडवले तसेच त्यांना उपचारासाठी मुंबईला नेण्याची तयारी दर्शविली होती. मात्र जरांगे यांनी मुंबईऐवजी छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याची तयारी दर्शविली होती. त्यानुसार ते रविवारी या रुग्णालयात दाखल झाले होते. रविवारीच त्यांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. या तपासण्यांचे रिपोर्ट रात्री आले. याविषयी डॉ. अभिमन्यू माकने यांनी सांगितले की, सर्व रिपोर्ट नॉर्मल आले आहेत. मात्र त्यांना आरामाची गरज आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यासंदर्भात मंगळवारी निर्णय घेतला जाईल. माजी मंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी त्यांची रुग्णालयात भेट घेतली.