आंबा बाजारात पडून...
By Admin | Updated: April 28, 2016 23:52 IST2016-04-28T23:28:20+5:302016-04-28T23:52:24+5:30
औरंगाबाद : मागील वर्षीच्या तुलनेत यंदा आंब्याचे उत्पादन कमी असल्याने बाजारात आंबा ‘भाव’ खात आहे. मात्र, महागड्या आंब्याला ग्राहक हात लावण्यासही तयार नाहीत.

आंबा बाजारात पडून...
औरंगाबाद : मागील वर्षीच्या तुलनेत यंदा आंब्याचे उत्पादन कमी असल्याने बाजारात आंबा ‘भाव’ खात आहे. मात्र, महागड्या आंब्याला ग्राहक हात लावण्यासही तयार नाहीत. परिणामी फळांचा राजा आंबा अजूनही खवय्यांच्या प्रतीक्षेत आहे. जाधववाडीत दररोज ३० टनांपेक्षा अधिक आंब्याची आवक होत आहे. पण त्यातील निम्माही विकला जात नाही, अशी परिस्थिती आहे.
बाजारात सध्या एकानंतर एक परराज्यांतून आंबे दाखल होत आहेत. प्रत्येकाचा रंग, आकार, गोडी वेगळी. बाजारात रत्नागिरी, देवगड येथील हापूस आंब्याला सर्वाधिक भाव असला तरी आता तेथील अस्सल हापूसची आवक संपत आली आहे. त्यामुळे बंगळुरूहून येणाऱ्या हापूस आंब्यालाच रत्नागिरी, देवगडचा हापूस म्हणून ग्राहकांच्या माथी मारला जात आहे. ग्राहकांमधील हापूसबद्दलच्या अज्ञानाचा फायदा काही विक्रेते घेत आहेत. बाजारात सर्वप्रथम आंब्याचा हंगाम तामिळनाडू येथील हापूस आंब्याने सुरू झाला. त्यानंतर केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटकातील आंबा बाजारात आला आहे. बाजारात हापूससोबत बदाम, लालबाग, कदुस, दसेरी आंबे मिळत आहेत. तुरळक प्रमाणात का होईना; परंतु गुजरातच्या केशर आंब्याचे बाजारात आगमन झाले आहे. मे महिन्यात मराठवाड्यातील केशर, गुजरातमधील केशरची आवक मोठ्या प्रमाणात होईल. त्यानंतर मध्यप्रदेशातील व जूनमध्ये उत्तर प्रदेशातील आंबा बाजारात येईल. यंदा मराठवाड्यात आंब्याचे उत्पादन कमी असले तरीही परप्रांतातून आंबे मोठ्या प्रमाणात बाजारात येणार आहेत. जाधववाडीतील अडत बाजारात दररोज ३० टनांपेक्षा अधिक आंब्याची आवक होत आहे. यासंदर्भात मराठवाडा फळ आणि भाजीपाला अडत संघटनेचे अध्यक्ष युसूफ चौधरी यांनी सांगितले की, यंदा मराठवाड्यातच नाही तर परप्रांतांतही आंब्याचे उत्पादन घटले आहे. पण आपल्यापेक्षा परप्रांतांत उत्पादन चांगले आहे. यामुळे यंदाही परप्रांतांतील आंब्यावरच अवलंबून राहावे लागणार आहे. अडत विक्रीत केरळचा हापूस १२० ते १४० रुपये किलो, बंगळुरुचा हापूस १०० ते ११० रुपये, रत्नागिरीच्या हापूसची ४ ते ६ डझनची पेटी १३०० ते १५०० रुपये, गुजरातचा केशर ६० ते ८० रुपये, कदुस ६० रुपये तर दसेरी, बदाम (बेनिशान) ५० ते ७० रुपये किलो विकला जात आहे.