मांगीरबाबा यात्रेस मध्यरात्री महाआरतीने सुरुवात; सलग चौथ्या वर्षी गळ टोचणीची अघोरी प्रथा बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 18:53 IST2025-04-18T18:53:02+5:302025-04-18T18:53:30+5:30
नवस केलेल्या महिला व पुरुषांना वाजतगाजत मंडपाप्रमाणे चारही बाजूला कापड धरून दर्शनाला नेले जात होते.

मांगीरबाबा यात्रेस मध्यरात्री महाआरतीने सुरुवात; सलग चौथ्या वर्षी गळ टोचणीची अघोरी प्रथा बंद
- श्रीकांत पोफळे
करमाड : नवसाला पावणारा देव म्हणून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मांगीरबाबाच्या यात्रेला बुधवारी मध्यरात्री महाआरतीने सुरुवात झाली. गुरुवारी पहिल्या दिवशी यात्रेमध्ये भाविकांची सुमारे ७० ते ७५ टक्के घट बघायला मिळाली. शुक्रवारपासून भाविकांच्या संख्येत वाढ होईल, असा अंदाज देवस्थान समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष भास्कर कचकुरे, सचिव सुरेश नाईकवाडे, सरपंच पुष्पा कचकुरे, उपसरपंच सर्जेराव कचकुरे ग्रामपंचायत व देवस्थान समितीचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांची उपस्थिती होती. सलग तिसऱ्या वर्षी गळटोचणी प्रथा बंद झाल्यानंतर गुरुवारी ५०१ बोकडांचा, तर २०५ कोंबड्यांचा नैवेद्य मांगीरबाबा चरणी अर्पण करण्यात आला. कोरोनानंतर सलग चौथ्या वर्षी गळ टोचणीची अघोरी प्रथा बंद असल्याचे बघायला मिळाले. भाविकांची संख्या कमी असल्यामुळे मांगीरबाबा कमानीतून शेंद्रा गावात जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती.
गुरुवारी पहाटेपासून नवस फेडणारे भाविक मंदिराकडे अनवाणी जात होते. नवस केलेल्या महिला व पुरुषांना वाजतगाजत मंडपाप्रमाणे चारही बाजूला कापड धरून दर्शनाला नेले जात होते. यात्रा परिसरात रहाटपाळणे, मौतका कुंवा, तसेच अनेक खेळण्या यात्रेत आल्या आहेत. मांगीरबाबांचे फोटो, गाण्याच्या सीडी, प्रसादाचे साहित्य, सौंदर्यप्रसाधने, रसवंती, कपडे, साड्या, टोप्या, पर्स, आदी दुकानांमध्ये गर्दी होती. यावेळी देवस्थान समितीचे वैजिनाथ मुळे, साळुबा कचकुरे, योगेश कचकुरे, संदीप दांडगे, किशोर शेजूळ भाविकांना मार्गदर्शन करीत होते. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सरपंच पुष्पा कचकुरे, उपसरपंच सर्जेराव कचकुरे, जावेद पठाण, रवी गिरी, हौसाबाई नाईकवाडे, शंकर नाईकवाडे, संजय भगुरे, बाळू कचकुरे परिश्रम घेत होते.
संबंधित शासकीय विभागाकडून सोयी-सुविधा
कुठलाही अनुचित प्रकार घडू नये व वाहतूककोंडी होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात आहेत. आरोग्य विभागाची सेवा २४ तास उपलब्ध आहे. ग्रामपंचायत व देवस्थान समितीच्या वतीने जागोजागी ध्वनिक्षेपकावर मार्गदर्शन केले जात होते. सूचनाफलक, दिशादर्शक फलक लावलेले आहेत. अशा पद्धतीने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार संबंधित शासकीय विभागाकडून कर्तव्य बजावले जात होते.